खातेप्रमुखांनाे, रजेवर जाता? मग पूर्वपरवानगी घ्या; सीईओंनी काढले लेखी आदेश
By जितेंद्र दखने | Published: May 4, 2024 09:28 PM2024-05-04T21:28:06+5:302024-05-04T21:28:26+5:30
यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी लेखी स्वरूपात २५ एप्रिल रोजी आदेश जारी केले आहेत.
अमरावती : जिल्हा परिषदेत विविध विभागांचे प्रमुख असलेल्या विभागप्रमुखांसह १४ पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी यांनी रजेवर जाण्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक केले आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी लेखी स्वरूपात २५ एप्रिल रोजी आदेश जारी केले आहेत.
जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या विविध विभागांचे प्रमुख तसेच पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी हे रजेवर जाताना परस्पर अर्ज पाठवून रजेवर जात असल्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढला होता.
विभागप्रमुख तसेच गटविकास अधिकारी हे अत्यंत जबाबदारीचे पद असल्याने कार्यालयातील प्रमुखाच्या अनुपस्थितीमुळे महत्त्वाचे निर्णय घेण्यास अडचण निर्माण होते. याद्वारे सर्व विभागप्रमुख आणि गटविकास अधिकारी यांनी यापुढे रजेवर जाण्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची पूर्व लेखी परवानगी घेऊनच रजेवर जावे. अपवादात्मक परिस्थितीत लेखी परवानगी घेणे शक्य नसल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांना रजेबाबत विनंती करून त्यांच्या मान्यतेनेच रजा घेणे बंधनकारक केले आहे. यानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय कार्यालय प्रमुख रजेवर गेल्यास याबाबतची गंभीर नोंद घेण्यात यावी. याविषयी दक्षता घेण्याचे या लेखी आदेशात जिल्हा परिषदेतील विभागप्रमुख तसेच १४ पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या लेखी आदेशात बजावले आहे.
विभागप्रमुख, गटविकास अधिकारी ही अत्यंत जबाबदारीची पदे आहेत. मात्र बरेचदा विभागप्रमुख, गटविकास अधिकारी हे परस्पर अर्ज पाठवून रजेवर निघून जायचे. यामुळे प्रशासनात महत्त्वाच्या विषयांबाबत निर्णय घेताना अडचणी येत असत. त्यामुळे जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी रजेवर जाण्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक केले आहे.
- संतोष जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती