केंद्रांवर तोबागर्दी, आबालवृद्धांना लसींची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:13 AM2021-04-27T04:13:12+5:302021-04-27T04:13:12+5:30

सोमवारी २५ हजार लसी प्राप्त, अमरावती शहरातील केंद्रांवर दुपारी २ नंतर पुरवठा अमरावती : कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या कोविशिल्ड ...

Tobagardi at centers, waiting for vaccinations for children and the elderly | केंद्रांवर तोबागर्दी, आबालवृद्धांना लसींची प्रतीक्षा

केंद्रांवर तोबागर्दी, आबालवृद्धांना लसींची प्रतीक्षा

Next

सोमवारी २५ हजार लसी प्राप्त, अमरावती शहरातील केंद्रांवर दुपारी २ नंतर पुरवठा

अमरावती : कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचा पुरवठा राज्य शासनाकडून अल्प प्रमाणात होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात लसीकरण केंद्रांवर तोबागर्दी होत असून, कोरोनापासून सुरक्षा मिळावी, यासाठी आबालवृद्ध लस घेण्यासाठी तासन्‌तास रांगेत उभे राहत आहेत. जिल्ह्याकरिता सोमवारी सकाळी ९ वाजता २५ हजार लसी प्राप्त झाल्या. त्यानंतर वितरणाचे नियोजन करण्यात आले.

जिल्हा क्षय रुग्णालयाच्या आवारात जिल्हा लस भांडार साकारण्यात आले आहे. याच ठिकाणाहून जिल्ह्यातील १४ तालुके, महापालिका हद्दीत व खासगी दवाखान्यांना लसींचा पुरवठा केला जातो. हल्ली कोरोना संक्रमित रुग्ण आणि मृत्युसंख्या वाढत असल्याने लसीकरणाकडे नागरिकांचा कल वाढला आहे. ४५ वर्षांवरील आणि ज्येष्ठ नागरिकांना लस घेण्यासाठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागत असल्याचे वास्तव आहे. ऑनलाईन नोंदणी, आधार कार्ड तपासणीनंतर लस टोचली जाते. मात्र, लसींचा तुटवडा असल्याने रांगेत उभे राहून ज्येष्ठ नागरिक वैतागले आहेत.

कोरोना या जीवघेण्या आजारापासून बचाव करण्यासाठी विशेषत: ज्येष्ठांनी लस घेण्याची मानसिकता तयार केली असताना लसीकरण केंद्रांवर लस पोहोचली नाही, असे चित्र महापालिका लसीकरण केंद्रांवर सोमवारी दुपारी १२ वाजता अनुभवता आले. शासकीय आणि खासगी अशी जिल्ह्यात ७३ लसीकरण केंद्रे आहेत. सोमवारी प्राप्त २५ हजार लसींपैकी २३,४५० लसींचे वितरण करण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत हा लसींचा साठा पुरेल एवढा वितरित करण्यात आला आहे.

--------------

लसीकरण केंद्रांची संख्या अशी

महापालिका : ११

खासगी दवाखाने : ११

जिल्हा रुग्णालय : ४

ग्रामीण परिसर : ४९

------------------

असे झाले सोमवारी लसींचे वितरण

अमरावती महापालिका : ५०००

अमरावती तालुका : १०००

अचलपूर : १५००

अंजनगाव सुर्जी : ९००

दर्यापूर : १२००

धारणी : १०००

चिखलदरा : ८००

मोर्शेी : १२००

वरूड : १५००

तिवसा : ९००

चांदूर रेल्वे : १०००

धामणगाव रेल्वे : १२००

भातकुली : १००

चांदूर बाजार : १०००

नांदगाव खंडेश्वर : ८००

जिल्हा सामान्य रुग्णालय : ८००

नऊ खासगी रुग्णालय : २६५०

----------------------

कोट

आरोग्य सहसंचालकांकडे जिल्ह्यासाठी चार लाख लसींची मागणी केली होती. त्यापैकी सोमवारी २५ हजार लसी प्राप्त झाल्या आहेत. मागणी अधिक, पुरवठा कमी असल्याने तालुकास्तरावरून लसी घेऊन जाण्यासाठी वाहने बोलावली. इंधन खर्चाला परवडत नाही. लसींचे वितरण करण्यात आले असून, दोन दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा आहे.

- दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी

Web Title: Tobagardi at centers, waiting for vaccinations for children and the elderly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.