आज सावंग्यात जळणार लाखोंचा कापूर!
By admin | Published: April 8, 2016 12:14 AM2016-04-08T00:14:00+5:302016-04-08T00:14:00+5:30
नजीकच्या सावंगा विठोेबा येथील श्री कृष्णाजी महाराजांच्या दर्शनाचा मुहूर्त गुढीपाडव्याचाच असल्याने शुक्रवार ८ एप्रिल रोजी राज्यभरातून लाखो भक्तांची गर्दी येथे उसळणार आहे.
प्रभाकर भगोले चांदूररेल्वे
नजीकच्या सावंगा विठोेबा येथील श्री कृष्णाजी महाराजांच्या दर्शनाचा मुहूर्त गुढीपाडव्याचाच असल्याने शुक्रवार ८ एप्रिल रोजी राज्यभरातून लाखो भक्तांची गर्दी येथे उसळणार आहे. प्रथेनुसार येथे लाखोंचा कापूर जाळणार आहे.
गुढीपाडव्याला या छोट्याशा गावाला आगळे महत्त्व प्राप्त होते. कृष्णाजी पर्यटन स्थळाच्या काठावर सावंगा विठोबा येथे तीनशे ते चारशे वर्षांपूर्वी कृष्णाजी महाराजांनी समाधी घेतली आहे. तेव्हापासून हे स्थळ तीर्थक्षेत्र बनले आहे. या यात्रेत उज्ज्वल भविष्याच्या कामनेसाठी लाखो भाविक येतात. येथे गुढीपाडव्याला लाखो रूपयांच्या कापुराची विक्री होते. श्री कृष्णाजी महाराज मंदिरासमोर ७२ फूट लांबीचे दोन खांब आहेत. या खांबावर लाखो भाविकांच्या उपस्थितीत नवीन खोळ चढविण्याचा कार्यक्रम दरवर्षी होत असतो. अवधूत महाराजांच्या ओव्या भक्तांना तोंडपाठ असून त्यांच्या वाणीतून शब्दबध्द करून विश्वस्तांनी त्या ओव्यांचा संग्रह प्रसिध्द केला आहे.
गुढीपाडव्याला व एरवीही या या संस्थानात लाखो भाविक येत असल्याने दानपेटीत गोळा झालेल्या रकमेतून येथे भक्तनिवास बांधण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याची सोयदेखील संस्थानने येथे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिली आहे. भक्तांना सावंगा येथे ये-जा करणे सोपे व्हावे, यासाठी राज्य परिवहन महामंडळाला यात्रेकरिता प्रासंगिक बसेस सोडण्याच्या सूचनादेखील विश्वस्तांनी केल्या आहेत.
गुढीपाडव्याला या यात्रेचे विशेष महत्त्व असल्याने सर्वसामान्य नागरिक मिळेल त्या वाहनांनी सावंगा विठोबा येथे जातील. येथे यात्रेदरम्यान पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यात्रेसाठी गोविंद राठोड, हरिदास सोनवाल, वामन रामटेके, दिनकर मानकर, अनिल बेलसेर, रूपसिंग राठोड, दिगंबर राठोड, दत्तुजी रामटेके, विनायक पाटीील, कृपासागर राऊत, पुंजाराम नेमाडे, बबनराव चौधरी आदी प्रयत्नरत आहेत.