आज जिल्हा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 11:15 PM2018-08-08T23:15:08+5:302018-08-08T23:18:14+5:30

जिल्हा बंदच्या पूर्वसंध्येला बुधवारी सायंकाळी सकल मराठा समाजाने शहरातून भव्य दुचाकी रॅली काढली. मां जिजाऊ, शिवरायांच्या जयघोषाने शहर दुमदुमले. कुठेही अनुचित घटना घडू नये, याची काळजी घेऊन शहरातील बांधवांनी गुरुवारी सकाळी राजकमल चौकात ठिय्या देण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले. तालुका मुख्यालयांसोबत गावागावांत गुरुवारी कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे.

Today the district is closed | आज जिल्हा बंद

आज जिल्हा बंद

Next
ठळक मुद्देमराठा क्रांती ठोक आंदोलनतालुका मुख्यालयांसह गावागावांत बंदगुरुवारी सकाळी ९ वाजता राजकमल चौकात ठिय्या, चौकाचौकांत पोलिसांचा राहणार तगडा बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा बंदच्या पूर्वसंध्येला बुधवारी सायंकाळी सकल मराठा समाजाने शहरातून भव्य दुचाकी रॅली काढली. मां जिजाऊ, शिवरायांच्या जयघोषाने शहर दुमदुमले. कुठेही अनुचित घटना घडू नये, याची काळजी घेऊन शहरातील बांधवांनी गुरुवारी सकाळी राजकमल चौकात ठिय्या देण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले. तालुका मुख्यालयांसोबत गावागावांत गुरुवारी कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे.
ज्वलंत मागण्या विनाविलंब मंजूर करण्याची गरज असताना शासन दिरंगाईचे धोरण अवलंबत असल्याचा आरोप सकल मराठा समाज बांधवांनी केला आहे. या ज्वलंत विषयावर राज्य शासन तारखांवर तारखा देऊन मराठा समाजाची दिशाभूल करीत आहे. याबद्दल प्रचंड रोष आहे.
शासन-प्रशासन हादरले
दोन वर्षांत ५८ अभूतपूर्व मोर्चाद्वारे शांततेच्या मार्गाने सकल मराठा समाजाने समस्यांची मांडणी शासनासमोर केली. जिल्ह्यातदेखील २२ सप्टेंबर २०१६ रोजी अभूतपूर्व मोर्चा सकल मराठा बांधवांनी काढला. मात्र, फलश्रुती शून्य आहे. शिक्षण व नोकरीच्या लाभापासून समाजातील युवक वंचित आहेत. यासह विविध मागण्या प्रलंबित आहेत. त्याच्या निषेधार्थ आगडोंब उठून महाराष्ट्रात ज्वलंत स्वरूपाचे आंदोलन पेटले आहे. मराठ्यांच्या गनिमी काव्याने शासन-प्रशासन हादरले आहे.
आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या - बहुजन क्रांती मोर्चा
काकासाहेब शिंदेंची आत्महत्या नसून, ही हत्याच आहे. याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी ज्यांनी आत्महत्या केली, त्यांच्या कुटुंबाला ५० लाख व कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी द्यावी. आंदोलकांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी बहुजन क्रांती मोर्चाचे अध्यक्ष सुनील डोंगरदिवे, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे अब्दुल्ला, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे सिद्धार्थ देवरे, भारत मुक्ती मोर्चाचे अतुल खांडेकर आदींनी केली.
बंद दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
बंद दरम्यान रुग्णालये, औषधी केंदे्र, अ‍ॅम्ब्यूलन्स सेवा, दूध सेवा, फायर ब्रिगेड या अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सेवा बंद राहतील. ९ आॅगस्टला सकाळी ७ ते रात्रीपर्यंत सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, ठोक व चिल्लर दुकाने, सर्व प्रकारची वाहतूक सेवा, एसटी बससेवा, शालेय विद्यार्थी वाहतूक वाहन, आॅटोरिक्षा, मिनीबस, महापालिकेची बस वाहतूक सेवा तसेच सर्व शाळा व महाविद्यालये तसेच शिकवणी वर्ग बंद राहतील. शेतकऱ्यांनी गुरुवारी बाजार समितीमध्ये माल विक्रीस आणू नये, असे आवाहन सकल मराठा समाजाद्वारा करण्यात आले.
क्षत्रिय मराठा समाज उन्नती मंडळाचा पाठिंबा
विदर्भात मराठा समाज हा भोसलेकालीन राजवटीपासून वास्तव्याला आहे. त्याची आज आर्थिक परवड होत आहे. समाजाची आर्थिक स्थिती नाजूक असल्यामुळे शैक्षणिक व इतरही क्षेत्रात प्रगती करू शकला नाही. त्यामुळे शासनाने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी क्षत्रिय मराठा समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष दिनुभाऊ चौधरी व सचिव विनोद मोहिते यांनी बुधवारी जिल्हाधिकाºयांकडे केली.
जिल्हा बंदला युवा स्वाभिमानचा पाठिंबा
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, ही मागणी करीत युवा स्वाभिमान पार्टीने गुरूवारच्या जिल्हा बंदला जाहीर पाठिंबा दिला. पक्षाच्या बुधवारच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी आ. रवि राणा, नवनीत राणा, जयंतराव वानखडे, अजय गाडे, निळकंठराव कात्रे, विनोद जायलवाल, गजानन बोंडे, मंगेश इंगोले, रेखा पवार गिरीश कासट आदी उपस्थित होते.
शांततेत बंद पाळा : भाजप
मराठा आरक्षणासाठी पुकारलेला बंद शांततेच्या मार्गाने व्हावा, यासाठी सर्व पक्ष, समाजाचे नेते व कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी केले आहे.
सिटीलँड ड्रिम्जलँड बिझीलँड राहणार बंद
सकल मराठा समाजाच्या जिल्हा बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कापडाची मोठी बाजारपेठ असणारे सिटीलँड, ड्रिम्जलँड, बिझीलँड ही बाजारपेठ गुरुवारी बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाºयांनी घेतला. ही माहिती मुकेश हरवानी, संजय मालानी व विजय भुतडा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
बंदच्या आवाहनासाठी बडनेऱ्यात मोटारबाईक रॅली
बडनेरा : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बडनेऱ्यातही आठवडी बाजार स्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून बुधवारी दुपारी ४ वाजता दुचाकी रॅली काढण्यात आली. शहराच्या मुख्य भागातून रॅली फिरली. व्यापारी वर्गा$ने गुरुवारी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवावी, असे आवाहन करण्यात आले. पुढे ही रॅली अमरावतीकडे रवाना झाली. रॅलीत सकल मराठा बांधव सहभागी झाले.
हायवेवर टायर जाळले
राम मेघे महाविद्यालयासमोरून जाणाऱ्या एक्स्प्रेस हायवेलगत दोघा दुचाकीस्वारांनी टायर जाळून ‘एक मराठा - लाख मराठा’, आरक्षण मिळालेच पाहीजे, असा नारा देऊन गनिमी काव्याने आंदोलन केले. दोघेही तोंडाला रूमाल बांधून होते. ८ मे रोजी दुपारी साडेबारा वाजता हे आंदोलन झाले.

Web Title: Today the district is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.