आज महापालिका, झेडपीचे धूमशान

By Admin | Published: February 21, 2017 12:04 AM2017-02-21T00:04:09+5:302017-02-21T00:04:09+5:30

अमरावती महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडेल.

Today the municipal corporation, ZP Dhumashan | आज महापालिका, झेडपीचे धूमशान

आज महापालिका, झेडपीचे धूमशान

googlenewsNext

अमरावती महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडेल. यासाठी निवडणूक यंत्रणेसह पोलीस विभागही सज्ज झाला आहे. महापालिकेच्या एकूण ८६ जागांसाठी ६२८ उमेदवारांचे तर जिल्हा परिषदेच्या ४१७ व पंचायत समितीच्या ५३३ उमेदवारांचे भाग्य मंगळवारी ‘ईव्हीएम’बंद होईल. मतदान प्रक्रिया शांततापूर्ण व पारदर्शक वातावरणात पार पडावी, यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. सर्वच मतदान केंद्रांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार असून संवेदनशिल मतदान केंद्रांवर पोलिसांचा विशेष ‘वॉच’ राहणार आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडावी, यासाठी प्रशासन सुसज्ज असून मतदानाचा टक्का वाढविण्यावर प्रशासनाने यंदा विशेष भर दिल्याने त्याचा परिणामही मतदानावर नक्कीच दिसून येईल.
महापालिका
८६ जागा, ६२८ उमेदवार

अमरावती : महापालिकेच्या सहाव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार २१ फेब्रुवारीला सकाळी ७.३० ते ५.३० या कालावधीत मतदान होत आहे. एक जागा अविरोध झाल्याने उर्वरित ८६ जागांसाठी ही निवडणूक होणार असून त्यासाठी महापालिकेसह निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.
महापालिका क्षेत्रातीेल ५,७२,६४८ मतदारांसाठी एकूण ७३५ मतदान केंद्र स्थापित करण्यात आले आहेत. सोमवारी सायंकाळच्या सुमारास मतदान केंद्राध्यक्षासह तीन मतदान अधिकारी, ईव्हीएम आणि संबंधित साहित्य मतदान केंद्रांवर पोहोचते झाले आहे.
मंगळवारी महापालिकेच्या ८६ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा जाहीर प्रचार १९ फेब्रुवारी सायंकाळी ५.३० वाजता संपुष्टात आला. महापालिकेचा सत्तासोपान चढण्यासाठी भाजप, शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चढाओढ आहे. भाजपच्या रीता पडोळे अविरोध निवडून आल्याने २२ प्रभागातील ८६ जागांसाठी निवडणूक होत आहे. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणाऱ्या यानिवडणुकीसाठी तब्बल ६२८ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे ठाकले आहेत. निवडणुकीची मतमोजणी येथिल विभागीय क्रीडा संकुलातील ईनडोअर स्टेडियममध्ये २३ फेब्रुवारीला होणार आहे. ७३५ मतदान केंद्रासाठी ८१९ पथके, ८०० कंट्रोल युनिट आणि ३२०० बॅलेट युनिट कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती सहायक निवडणूक अधिकारी मदन तांबेकर यांनी दिली. मतदान केंद्रावरील पथकामध्ये एक मतदान केंद्राध्यक्ष, तीन निवडणूक अधिकारी, एक पोलीस शिपाई आणि आवश्यकतेनुसार एक शिपाई राहणार आहे. महापालिका निवडणुकीचे मुख्य निवडणूक निरीक्षक तथा अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक सोमवारीच महापालिकेत दाखल झाले असून ते मतमोजणीपर्यंत मुक्कामी राहणार आहेत.

मिनी मंत्रालय
५९ गट,८८ गण,९५० उमेदवार

‘अमरावती : जिल्हा परिषदेचे ५९ गट व पंचायत समितीच्या ८८ गणांसाठी उद्या मंगळवारी मतदान होणार आहे. यासाठी जिल्ह्यात एक हजार ७८७ मतदान केंद्र आहेत. साधारणत: ११ हजार अधिकारी, कर्मचारी व तीन हजारांवर पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर मतदानाची मदार राहिल. मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.
जिल्हा परिषदेसह पंचायत समितीसाठी मंगळवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० दरम्यान मतदान होणार आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात १३ लाख ९० हजार ८९६ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये ७ लाख २५ हजार ६९ पुरूष व ६ लाख ६५ हजार २६७ महिलांसह २० इतर मतदार आहेत. निवडणुकीसाठी जिल्ह्यात १७८७ मतदान केंद्र आहेत. यापैकी ५११ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. याठिकाणी अधिक सुरक्षा व सूक्ष्म निरीक्षकांचा ‘वॉच’ राहणार आहे. नांदगाव खंडेश्वर येथील चार मतदार केंद्र अतिसंवेदनशिल असून मतदानासाठी तीन हजार ४६० मतदान यंत्र लागणार आहेत. चिखलदरा तालुक्यात २५०, धारणी १६०, अचलपूर ३५०, दर्यापूर ३२०, भातकुली २५०, अंजनगाव सुर्जी २२०, धामणगाव रेल्वे १३०, चांदूररेल्वे ९०, तिवसा १००, नांदगाव खंडेश्वर २८०, मोर्शी ३४०,वरूड ३००,चांदूरबाजार ३८० व अमरावती तालुक्यात २९० बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट लागणार आहेत.
यानिवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर निवडणूक लढवित असल्याने एकेका मतासाठी संघर्ष होणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांची नजर राहिल. १०० मीटरच्या आत मोबाईल वापरावर बंदी आहे तर २०० मीटर अंतराच्या आत वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याअंतरामधील राजकीय पक्षांच्या निशाण्या सोमवारी सायंकाळी मिटविण्यात आल्या आहेत.

डाव्या हाताच्या तर्जनीला ‘मार्कर’
अमरावती : २०० मीटर अंतराबाहेर राजकीय पक्षाचे किंवा उमेदवाराचे एक बुथ राहणार आहे. मतदान केंद्रात उमेदवार, निवडणूक कर्मचारी व सुरक्षा कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतरांना प्रवेशबंदी आहे. उमेदवाराला सुद्धा केवळ ३ मतदारांचे मतदान होईस्तोवरच थांबण्यास अनुमती आहे. प्रत्येक उमेदवाराचा एक मतदान प्रतिनिधी मतदान केंद्रात राहणार आहे. सायंकाळी ५.३० पर्यंत मतदानप्रक्रिया सुरू राहील. मतदानासाठी मतदारांची ओळख असलेले १७ पुरावे ग्राह्य धरण्यात येणार आहेत. या निवडणुकीत मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीला ‘मार्कर’ ने शाई लावण्यात येणार आहे.
सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान
जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी मतदान केंद्रात सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत मतदान होणार आहे तर २३ फेब्रुवारीला संबंधित मतमोजणी केंद्रावर सकाळी १० पासून मतमोजणी सुरू होणार आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत सर्वच तालुक्यांचे चित्र स्पष्ट होणार आहेत.
कामगारांना दोन तासांची सवलत
सर्वच क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी पगारी सुटी देण्यात येणार आहे. मात्र, अखंडित उद्योगामध्ये मतदान करण्यासाठी कामगारांना दोन तासांची सवलत देण्याचे निर्देश शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत.
११ हजार कर्मचाऱ्यांवर निवडणुकीची मदार
प्रत्येक मतदान केंद्रावर एक मतदान केंद्राध्यक्ष व तीन मतदान अधिकारी व स्थानिक कर्मचारी असे मिळून ५ ते ६ कर्मचाऱ्यांचे पथक असते. काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखीव ठेवण्यात येते. अशा एकूण ११ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निवडणुकीची मदार राहणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Today the municipal corporation, ZP Dhumashan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.