आज राष्ट्रीय वन हुतात्मा दिन.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:15 AM2021-09-11T04:15:03+5:302021-09-11T04:15:03+5:30
आज राष्ट्रीय वन हुतात्मा दिन राज्यातील पहिला वन शहीद स्तंभ मेळघाटात स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी घेतली दखल अनिल कडू परतवाडा : ...
आज राष्ट्रीय वन हुतात्मा दिन
राज्यातील पहिला वन शहीद स्तंभ मेळघाटात
स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी घेतली दखल
अनिल कडू
परतवाडा : वन आणि वन्यजीव संरक्षण व संवर्धनाचे कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य प्राप्त झालेल्या वनअधिकारी व वनकर्मचाऱ्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ११ सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय वन हुतात्मा दिन म्हणून साजरा केल्या जातो. दरम्यान, मेळघाटात वन शहीद झालेल्या वनअधिकाऱ्याच्या स्मरणार्थ इंग्रजांनी स्वातंत्र्यापूर्वी मेळघाटात वन शहीद स्तंभ उभारला आहे. मेळघाटातील हा वन शहीद स्तंभ राज्यातील पहिला ठरला असून, आजही तो अस्तित्वात आहे.
स्वातंत्र्यापूर्वी मेळघाटच्या जंगलाचे वनव्यवस्थापन, वन प्रशासन इंग्रज अधिकाऱ्यांकडे होते. वन आणि वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनार्थ राबणारे अधिकारी, कर्मचारी त्यांच्या अधीनस्थ होते.
दरम्यान तत्कालीन मेळघाट फॉरेस्ट डिव्हिजन अंतर्गत कार्यरत फॉरेस्ट रेंजर नाझिर मोहम्मद यांचा जंगलाला लागलेली आग विझवितांना मृत्यू झाला होता. १ फेब्रुवारी १९३५ ला मेळघाटच्या जंगलाला लागलेल्या आगीत ते भाजल्या गेले होते. या स्थितीत त्यांची अमरावती येथील रुग्णालयात उपचारादरम्यान २३ फेब्रुवारी १९३५ला प्राणज्योत मालवली.
फॉरेस्ट रेंजर नाझिर मोहम्मद यांच्या कार्याची दखल घेत त्यांनी दाखविलेले धैर्य आणि समर्पणाच्या अनुषंगाने तत्कालीन इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक मार्बल स्टोन हरिसाल परिसरात लावला आहे. आजही तो वन शहीद स्तंभ म्हणून त्या ठिकाणी आहे. दरम्यान केंद्र शासनाच्या ७ मे २०१३च्या अधिसूचनेनुसार ११ सप्टेंबर हा राष्ट्रीय वन हुतात्मा दिन म्हणून घोषित करण्यात आला आणि नाझिर मोहम्मद यांच्या स्मृतीस उजाळा मिळाला.
**८४ वर्षांनंतर दुसरा स्तंभ
वन शहीद ठरलेले नाझिर मोहम्मद यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १९३५ मध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी उभारलेल्या स्मृतिस्तंभानंतर, तब्बल ८४ वर्षांनंतर, मेळघाटात २०१९ मध्ये दुसरा शहीद स्तंभ उभारला गेला. मेळघाटात शहीद झालेल्या वन अधिकारी व वन कर्मचाऱ्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चिखलदरा गार्डन मध्ये मेळघाटातील हा दुसरा वन शहीद स्तंभ आहे.
** मेळघाटात चार वन शहिदांची नोंद--
वन व वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनlर्थ
१९३५ पासून २०१९ पर्यंत मेळघाटात कर्तव्यावर शहीद झालेल्या चार वन शहिदांची नोंद घेण्यात आली आहे. यावर शहिदांची नावे २०१९ मध्ये उभारलेल्या चिखलदरा गार्डनमधील शहीद स्तंभावर अंकित आहेत. यात वन शहीद नाझिर मोहम्मद १९३५, वन शहीद त्र्यंबकराव भारती २००१, वन शहीद अभिष वाकोडे २०१०, आणि वन शहीद सुधाकर ढेमरे २०१३ यांचा समावेश आहे. मेळघाटच्या इतिहासात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा हे मानाचे स्थान वन शहिदांना मिळाले आहे.
दिनांक:--10/09/21 फोटो दोन