आजच्या दिवशी लागला रमण परिणामाचा शोध
By Admin | Published: February 28, 2017 12:13 AM2017-02-28T00:13:41+5:302017-02-28T00:13:41+5:30
चंद्रशेखर व्यंकट रमन यांनी भारतात आधुनिक विज्ञानाचा पाया घातला. त्यांचा जन्म इ.स. १८८८ मध्ये तिरुचिरापल्ली येथे झाला.
राष्ट्रीय विज्ञान दिन : रमण आधुनिक विज्ञानाचे शिल्पकार
अमरावती : चंद्रशेखर व्यंकट रमन यांनी भारतात आधुनिक विज्ञानाचा पाया घातला. त्यांचा जन्म इ.स. १८८८ मध्ये तिरुचिरापल्ली येथे झाला. भौतीकशास्त्रात मद्रास येथून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्या काळात भारतात वैज्ञानिक संशोधनाला फारसा वाव नव्हता त्यामुळे कोलकात्याला अर्थखात्यात त्यांनी नोकरी मिळविली. परंतु, रमन यांचा मूळचा पिंड विज्ञान क्षेत्रात संशोधन करण्याचा होता. भौतिक संशोधनपर काही लेखही मान्यवर संशोधन पत्रिकांमधून प्रकाशित झाले होते.
सरकारी नोकरीत असतानाही आपला सर्व फुरसतीचा वेळ विज्ञान संशोधन व अभ्यास यातच घालवित असत. अखेर सरकारी नोकरीत मन रमणे शक्य नसल्याने त्यांनी १९१७ मध्ये नोकरी सोडली आणि कोलकाता विद्यापीठात भौतिकशास्त्र विभागात (पलित प्राध्यापक) या पदावर दाखल होऊन तेथे अध्यापन व संशोधन कार्य सुरू केले. १६ वर्षे त्यांनी १९३३ पर्यंत पलित प्राध्यापक ही जागा भूषविली.
निसर्गातील विविधरंगी सृष्टी, फुले, फुलपाखरे, मनोहारी रंगाचे पक्षी, खनिजे, रत्ने यांचे चित्ताकर्षक रंग या साऱ्याविषयी त्यांना विद्यार्थी दशेपासूनच कुतूहल वाटत आले होते. १९२१ मध्ये ब्रिटीश साम्राज्यांतर्गत विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून रमन उपस्थित राहिले. या निमित्ताने त्यांना युरोप व इंग्लंडच्या प्रवासाची संधी मिळाली.
बोटीतून युरोपच्या वाटेवर असताना त्यांनी भूमध्य समुद्राचे स्वच्छ निळेशार पाणी पाहिले आणि सागर जलाच्या निळाईवर त्यांचे विचारचक्र सुरू झाले. त्यातूनच पुढे रमन परिणाम म्हणून जागतिक विज्ञान क्षेत्रात मान्यता पावलेल्या महत्वाच्या संशोधन कार्याचे बिज रुजून वाढीला लागले.
अधिवेशनाहून परत आल्यावर रामन यांनी अनेक पारदर्शक वायू आणि घन पदार्थातून व द्रव पदार्थातून प्रकाशकिरण आर-पार जावू दिले असता त्या किरणांच्या स्वभावधर्मात काय फरक पडतो याचे संशोधन सुरू केले. या प्रयोगात त्यांना असे आढळले की अशा पारदर्शक पदार्थातून प्रकाशकिरण आरपार जातात. त्यांचे काही प्रमाणात इतर दिशांना इतरस्त्र विखरून बाहेर पडणाऱ्या प्रकाश किरणांचा वर्णपट मूळच्या प्रकाश किरणांच्या वर्णपटापेक्षा वेगळा असतो.
पारदर्शक माध्यमातून प्रकाश किरण जात असताना प्रकाश कणांनी (फोटॉन्सची) टक्कर झाल्यामुळे हा विखुरणारा प्रकाश निर्माण होतो व माध्याचे रेणू व प्रकाशकण यांच्यातील प्रक्रियेने नव्या वर्णरेषा निर्माण होतात असे या घटनेचे स्पष्टीकरण रामन यांनी दिले.
या शोधाने साऱ्या जगभऱ्याच्या विज्ञान क्षेत्रात खळबळ उडाली. रामन यांच्या या नव्या शोधाबद्दल त्यांना १९३० या वर्षाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.
ब्रिटीश सरकारनेही त्यांना सर ही पदवी दिली. पादर्शक माध्यमातून प्रकाश किरण जात असताना त्यात आढळणाऱ्या वेगळ्या वर्णपटाला रामन स्प्रेट्रम हे नाव देण्यात आले. या नव्या वर्णरेषांना रामन लाईन्स अशी नावे देण्यात आली. तसेच या घटनेला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले.
आज जगभर ही नावे रुढ झाली आहेत. १९५४ मध्ये भारत सरकारने रामन यांना भारतरत्न ही सर्वोच्च पदवी देवून सन्मान केला. त्याचवर्षी रशियानेही त्यांना लेनिन पारितोषिक देवून त्यांचा सन्मान केला.
२१ नोव्हेंबर १९७० रोजी त्यांचे बंगलोर येथे देहावसान झाले. अखेरपर्यंत त्यांचा अभ्यास आणि संशोधन कार्य सुरूच होते. शेवटच्या काळात त्यांनी पुन्हा ध्वनी संशोधन सुरू केले होते. मृत्यूपूर्वी एकच महिना आधी त्यांनी बंगलोर येथे इंडियन अॅकेडमी आॅफ सायन्सच्या व्यासपीठावर व्याख्यान दिले होते, अशी माहीती हौशी खगोल अभ्यासक विजय गिरूळकर यांनी दिली. (प्रतिनिधी)