आज लक्ष्मी, कुबेर, नव्या केरसुणीची पूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 10:20 PM2018-11-06T22:20:20+5:302018-11-06T22:22:02+5:30
श्रीरामाने रावणाचा पराभव केल्यानंतर अयोध्येत परत येताना त्यांच्या वाटेवर लोकांनी लावलेले दिवे, गौतम बुद्धांच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी प्रज्ज्वलित केलेले लाखो दिवे; अशी विविध पुरातन इतिहासाची साक्ष असलेल्या दिवाळी सणाच्या दिवशी लक्ष्मी, कुबेर व नव्या केरसुणीची पूजा करण्याची परंपरा आजही कायम आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार/धामणगाव रेल्वे : श्रीरामाने रावणाचा पराभव केल्यानंतर अयोध्येत परत येताना त्यांच्या वाटेवर लोकांनी लावलेले दिवे, गौतम बुद्धांच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी प्रज्ज्वलित केलेले लाखो दिवे; अशी विविध पुरातन इतिहासाची साक्ष असलेल्या दिवाळी सणाच्या दिवशी लक्ष्मी, कुबेर व नव्या केरसुणीची पूजा करण्याची परंपरा आजही कायम आहे.
दिवाळी हा सण अश्विन कृष्ण द्वादशी ते कार्तिक शुक्ल द्वितीया या सहा दिवसांच्या कालावधीत साजरा करण्यात येतो. बळीच्या दानशूरपणामुळे प्रसन्न झालेल्या विष्णूने त्याला पाताळाचे राज्य दिले. भूलोकवासी त्याच्या आठवणीप्रीत्यर्थ प्रत्येक वर्षी दिवाळी साजरी करतील, असे आश्वासन दिले. दिवाळीचा हा आणखी एक संदर्भ आहे.
दिवाळीच्या एक दिवस अगोदर म्हणजे चतुर्दशीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. यामुळे आनंदित झालेल्या गोकुळवासीयांनी दुसऱ्या दिवशी अमावस्येला दीपोत्सव केला.
२५०० वर्षांपूर्वी गौतम बुद्धांच्या अनुयायांनी त्यांचा स्वागतसाठी लाखो दिवे लावले होते. जैन धर्मा$चे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांनी दिवाळीच्या दिवशी बिहारमधील पावापुरी येथे आपल्या शरीराचा त्याग केला. त्याच्या दुसऱ्या दिवशी महावीर संवत सुरू होते. त्यामुळे लोक याला नवीन वर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीपूजन करताना चौरंग अथवा पाट घेऊन त्यावर लाल अथवा पिवळे वस्त्र टाकतात. त्यावर स्वस्तिक काढून त्यावर लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवतात.
केरसुणीचे पूजन
घरातील अस्वच्छता घालविणारी केरसुणी ही लक्ष्मीचे प्रतीक. त्यामुळे या केरसुणीचे पूजन लक्ष्मीपूजनानिमित्त करण्याचा प्रघात पूर्वापार चालत आला आहे. त्यासाठी दिवाळीच्या खरेदीत केरसुणीचा क्रमांक हा होताच. दिवाळीवा नव्याकोऱ्या केरसुणीचे पूजन केले जाते.