लक्ष्मी, कुबेर अन् नव्या केरसुणीची आज पूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 05:00 AM2020-11-14T05:00:00+5:302020-11-14T05:00:15+5:30
बळीराजाने आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्रैलोक्यावर विजय मिळविला होता. या विजयाने भयभीत झालेल्या भगवान विष्णूने वामन रूप धारण करून बळीराजाला तीन पायात दान मागितले. बळीच्या दानशूरपणामुळे प्रसन्न झालेल्या विष्णूने त्याला पातळाचे राज्य देऊन भूलोकवासी त्यांच्या आठवणीनिमित्त प्रत्येकवर्षी दिवाळी साजरी करतील, असे आश्वासन दिले होते.
मोहन राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : प्रभू श्रीरामांनी रावणाचा पराभव केल्यानंतर अयोध्येत परतत असताना त्यांच्या वाटेवर लोकांनी लावलेले दिवे, गौतम बुद्धांच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी केलेला दीपोत्सव अशा विविध पुरातन इतिहासाची साक्ष असलेल्या दिवाळी सणाच्या दिवशी लक्ष्मी, कुबेर व नव्या केरसुणीची पूजा करण्याची परंपरा आजही कायम आहे.
दिवाळी हा सण अश्विन कृष्ण द्वादशी ते कार्तिक शुक्ल द्वितीया या सहा दिवसांच्या कालावधीत साजरा करण्यात येतो. बळीराजाने आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्रैलोक्यावर विजय मिळविला होता. या विजयाने भयभीत झालेल्या भगवान विष्णूने वामन रूप धारण करून बळीराजाला तीन पायात दान मागितले. बळीच्या दानशूरपणामुळे प्रसन्न झालेल्या विष्णूने त्याला पातळाचे राज्य देऊन भूलोकवासी त्यांच्या आठवणीनिमित्त प्रत्येकवर्षी दिवाळी साजरी करतील, असे आश्वासन दिले होते.
दिवाळीच्या एक दिवस अगोदर चतुर्थीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. यामुळे आनंद झालेल्या गोकुळवासीयांनी दुसऱ्या दिवशी अमावस्येला दिवे लावून आनंद साजरा केला होता. २५०० वर्षांपूर्वी गौतम बुद्धाच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी लाखो दिवे लावून दिवाळी साजरी केली होती. जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांनी दिवाळीला बिहारमधील पावापुरी येथे शरीर त्यागले. महावीर संवत्सर त्याच्या दुसऱ्या दिवशी सुरू होते. प्राचीन जैन ग्रंथात दीपोत्सवाचे वर्णन आहे.
असे करावे लक्ष्मीपूजन
लक्ष्मीपूजन करताना चौरंग अथवा पाट घेऊन त्यावर लाल अथवा पिवळे वस्त्र टाकले जाते. त्यावर स्वस्तिक काढावे. लक्ष्मीची मूर्ती व फोटो ठेवावा. पूजेसाठी सोने, चांदी, नाणे, नारळ, खोबरे, खडीसाखर, बतासे, फळ, लवंगा, धने, लाह्या ठेवाव्यात. जोड पानावर खारीक, बदाम, सुपारी ठेवण्यात येते. घरात गाईची व लक्ष्मीची पाऊले काढल्यानंतर व सर्व प्रथम तेलाचा दिवा लावतात. अशाप्रकारे लक्ष्मीची पूजा करण्यात येते.
केरसुणीला महत्त्व
नव्या केरसुणीची घराच्या बाहेर उजव्या बाजूस पूजा केली जाते. कुंकवाने स्वस्तिक काढण्यात येते. त्यावर नवीन केरसुणी ठेवल्यानंतर जुनी केरसुणी घरातील आतील भिंतीवर ठेवून लक्ष्मीपूजनाच्या अगोदर त्या केरसुणीने झाडत आणतात आणि केरसुणी उंबरठ्यावर आडवी ठेवून तिचा एक फळ तोडून बाहेर फेकण्यात येते. असा घराघरांत करण्यात येतो.