उपाध्यक्षांसह दोन सभापतींना आज खातेवाटप
By admin | Published: April 18, 2017 12:22 AM2017-04-18T00:22:59+5:302017-04-18T00:22:59+5:30
जिल्हा परिषदेत विषय समिती सभापतींची निवडणूक ३ एप्रिल रोजी आटोपली. आता खातेवाटपाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषद : आजच्या विशेष सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब
अमरावती : जिल्हा परिषदेत विषय समिती सभापतींची निवडणूक ३ एप्रिल रोजी आटोपली. आता खातेवाटपाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन विषय समितीच्या सभापतींना मिळणारे खाते जवळपास निश्चित झाले आहे. याची घोषणा मंगळवार १८ एप्रिल रोजी विशेष सर्वसाधारण सभेत अध्यक्षांद्वारे केली जाईल.
जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीने सत्ता मिळविल्यानंतर चार विषय समिती सभापतीपदाच्या निवडणुकीतही वर्चस्व अबाधित राखले आहे. समाजकल्याण आणि महिला व बालकल्याण समितीचा अपवाद वगळता उपाध्यक्ष व अन्य दोन विषय समिती सभापतींना अद्याप कोणतेही खाते देण्यात आले नाही. त्यामुळे या तिनही पदाधिकाऱ्यांना खातेवाटप करण्यासाठी मंगळवारी झेडपीच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली आहे. यासभेत अध्यक्ष नितीन गोंडाणे हे खातेवाटपाची रितसर घोषणा करतील.
खाते न मिळालेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती जयंत देशमुख आणि बळवंत वानखडे यांचा समावेश आहे. यातीन पदाधिकाऱ्यांना कोणते खाते मिळणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. मात्र, काँग्रेस व मित्रपक्षांनी त्यांना दिल्या जाणाऱ्या खात्यांवर आधीच शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे. त्यामुळे यासभेत खातेवाटपाची केवळ औपचारिक घोषणाच अध्यक्ष करणार आहेत. जिल्हा परिषदेत एकूण दहा विषय समिती आहेत. यामध्ये स्थायी, जलव्यस्थापन समितीचे पदसिद्ध सभापती अध्यक्षच आहेत तर समाजकल्याण, महिला बालकल्याण विभागाच्या सभापतींकडे अगोदरच सोपविण्यात आली आहे. याशिवाय उपाध्यक्ष व दोन विषय समिती सभापतींकडे जी खाती सर्वसाधारण सभेत अध्यक्ष सोपवतील त्य समितीचे सभापती म्हणून आजपासून कामकाज सांभाळणार आहेत.
खातेवाटपादरम्यान बदलांची शक्यता
नव्याने निवड झालेल्या उपाध्यक्षांसह दोन विषय समिती सभापतींना खातेवाटप करताना ऐनवेळी काही बदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने शिक्षण, बांधकाम, वित्त व आरोग्य खात्याचा सामावेश असेल. खातेवाटप करताना शासन धोरणानुसार कृषी व पशुसंवर्धन, स्थायी व जलव्यवस्थापन समितीचे खाते बदलता येत नसल्याने ही जोडी अभेद्य राहिल.
असे आहे संभाव्य खातेवाटप
झेडपीचे उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन तर विषय समितीवर निवड झालेले काँग्रेसचे जयंत देशमुख यांना शिक्षण व बांधकाम खाते मिळण्याची शक्यता आहे. रिपाइंचे बळवंत वानखडे यांना वित्त व आरोग्य खाते सोपविले जाऊ शकते.