आज शाळांमध्ये प्रवेशोत्सव, विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत
By admin | Published: June 27, 2017 12:04 AM2017-06-27T00:04:56+5:302017-06-27T00:04:56+5:30
आजपासून शाळांची पहिली घंटा वाजणार असून शाळांमध्ये प्रवेशोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
उत्साह : कुठे गुलाबपुष्प, कुठे रांगोळ्या, कुठे प्रभातफेरी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आजपासून शाळांची पहिली घंटा वाजणार असून शाळांमध्ये प्रवेशोत्सव आयोजित करण्यात आला आहे. अतिशय उत्साहवर्धक वातावरणात गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे. त्यामुळे शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणिय ठरणार आहे. नवप्रवेशित बालकांना शाळेची गोडी लगावी, याउद्देशाने प्रत्येक शाळेमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. त्याअनुषंगाने नियोजन करण्यात आले आहे.
दोन दिवसांपासून सर्व माध्यमांच्या शाळांचे शिक्षक व अधिकाऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. पहिल्या दिवशी शाळांना भेटी देण्यासाठी अधिकाऱ्यांची भरारी पथके तत्पर राहणार असून तालुकास्तरावर स्वतंत्र पथके नियुक्त केली जाणार आहेत. मोफत व सक्तीचे शिक्षणहक्क कायद्यानुसार एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, याकरिता विशेष प्रयत्न केले जात आहेत. मंगळवारी पहिल्या दिवशी नवप्रवेशित विद्यार्थ्यांसह इयत्ता पहिली व चौथीच्या बालकांचे गोड पदार्थ भरवून आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसह अनुदानित प्राथमिक शाळांतील बालकांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाईल. मंगळवारी गावागावात प्रभातफेरीचे आयोजन करून तसेच नवप्रवेशित विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन तसेच त्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले जाईल. शाळा परिसर आकर्षक रांगोळ्यांनी सजविला जाणार आहे.
पोषण
आहारही गोड
शाळेचा पहिला दिवस असल्याने पोषण आहारातील मेन्यूही गोड असणार आहे. यासंदर्भात सर्वच शाळांना शिक्षण विभागाने सूचना दिल्या आहेत, ७ ते ७.३०-बालकांची प्रथम भेट, ८ ते ९ - पाठ्यपुस्तके वितरण, मान्यवरांच्या हस्ते बालकांचे स्वागत, ९ ते १०- वर्षभर १०० टक्के उपस्थिती ठेवण्याबाबत माहिती विद्यार्थ्यांना दिली जाईल.
पाठ्यपुस्तकांचा पुरवठा
सर्वशिक्षा अभियानापासून शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व बालकांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. तसेच मोफत गणवेश योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात येणार आहे. दोन्ही गोष्टी एकत्रपणे देण्यात येतील.
शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय व्हावा, याउद्देशाने विशेष तयारी करण्यात आली आहे. रविवारपासून शाळांमध्ये लगबग सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत केले जाईल.
- एस.एम.पानझाडे
प्राथमिक शिक्षणाधिकारी