शहर स्वच्छतेचे आजपासून मुल्यांकन
By admin | Published: January 17, 2017 12:08 AM2017-01-17T00:08:04+5:302017-01-17T00:08:04+5:30
स्वच्छ भारत अभियानांतर्गत ५०० स्वच्छ शहर निवडण्यासाठी २००० गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे.
स्वच्छ सर्वेक्षण : त्रिसदस्यीय पथक दाखल, २००० गुणांची परीक्षा
अमरावती : स्वच्छ भारत अभियानांतर्गत ५०० स्वच्छ शहर निवडण्यासाठी २००० गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. यामध्ये अमरावती महापालिका परीक्षार्थी म्हणून सहभागी झाली आहे.
शहराची स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनाचे नियोजन तपासणीसाठी क्वॉलिटी कौन्सिल आॅफ इंडिया ‘क्युसीआय’ची टिम १७ ते १९ जानेवारीदरम्यान अमरावती येत असून त्यानिमित्ताने पालिकेने जोरदार तयारी केली आहे.
घनकचरा संकलन, वाहतूक, घनकचरा व्यवस्थापन, प्रक्रिया अशा विविध घटकांवर ‘स्वच्छ’ शहराचे नामांकन ठरणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी पालिकेने जोरकस प्रयत्न चालविले आहेत. वैयक्तिक शौचालय उभारणीसह शहर स्वच्छता, बायोगॅस, आर्गेनिक वेस्ट प्रकल्पावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
स्वच्छ भारत मिशनचे ‘सिनिअर अॅसेसर चारूदत्त पाठक व अन्य दोन अधिकाऱ्यांची क्युसीआयचे पथक मंगळवारी सकाळी शहरात दाखल होईल. तीन दिवसीय दौऱ्याचा मंगळवार पहिला दिवस आहे. पाठक हे महापालिकेत बसून स्वच्छता व्यवस्थापन प्रकल्प व अनुषंगिक सर्व ‘डाक्युमेंटेशन’ची पाहणी करणार आहे तर त्यांचे दोन सहकारी प्रत्यक्षात ‘स्पॉट व्हिजिट’ करतील. १७ ते १९ जानेवारीदरम्यान होणाऱ्या स्पॉट व्हिजिट आणि डॉक्युमेंटेशनवर देशातील ५०० शहरांमधील अमरावतीचे नामांकन ठरणार आहे. आयुक्त हेमंत पवार, अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांनी याबाबतची पूर्वतयारी पूर्ण केली आहे. (प्रतिनिधी)
आरोग्य अधिकाऱ्यांकडे जबाबदारी
शहरातील रस्ते, साफसफाई, सर्व्हिस लेन, गटारी खुल्या जागेतील कचरा कुंड्यांची केंद्रीय पथकाद्वारे तपासणी करण्यात येईल. त्याअनुषंगाने वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांच्याकडे विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे. स्वच्छता वैद्यकीय अधिकारी अजय जाधव यांच्यावरही अतिरिक्त आयुक्तांनी स्वच्छता विषयक धुरा सोपविली आहे.
आगार, रेल्वे व्यवस्थापकांना पत्र
स्वच्छ सर्वेक्षण २०१७ अंतर्गत केंद्रीय पथकाद्वारे शहरातील स्वच्छताविषयक व दैनंदिन साफसफाईची पाहणी केली जाईल. या अनुषंगाने मध्यवर्ती बसस्थानकासह बडनेरा आणि अमरावती रेल्वेस्टेशन, मास्टर्सला पत्र देण्यात आले आहे. १७ ते १९ दरम्यान होणाऱ्या या पाहणी दौऱ्यादरम्यान मध्यवर्ती बसस्थानकासह अमरावती व बडनेरा रेल्वे स्टेशनची विशेष स्वच्छता ठेवावी, असे पत्र महापालिकेद्वार करण्यात आले आहे.