आज घरोघरी ज्येष्ठा गौरींची प्रतिष्ठापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 11:02 PM2017-08-28T23:02:21+5:302017-08-28T23:02:56+5:30
गणेशाचे वाजतगाजत आगमन झाले की त्यापाठोपाठ घरोघरी ज्येष्ठा गौरींच्या स्वागताची तयारी सुरू होते.
वर्षा वैजापूरकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गणेशाचे वाजतगाजत आगमन झाले की त्यापाठोपाठ घरोघरी ज्येष्ठा गौरींच्या स्वागताची तयारी सुरू होते. विदर्भात ज्येष्ठा-कनिष्ठा गौरींच्या पूजनाचा सोहळा अवर्णनिय असतो. घरोघरी वेगवेगळ्या कुळाचाराप्रमाणे ज्येष्ठा-कनिष्ठेचे पूजन केले जाते. मंगळवारी ज्येष्ठा गौरी आवाहन म्हणजे प्रतिष्ठापना केली जाईल.
श्री गौरी महालक्ष्मीचे तीन दिवसांचे हे व्रत नक्षत्रप्रधान आहे. अनुराधा, जेष्ठा व मूळ नक्षत्रावर तीन दिवस हे व्रत केले जाते. यावर्षी म्हणजे भाद्रपद शुक्ल ८ मंगळवारी महालक्ष्मींची प्रतिष्ठापना होईल. या दिवशी संपूर्ण दिवसभर अनुराधा नक्षत्र असल्याने दिवसभर प्रतिष्ठापनेचा मुहूर्त आहे.
प्रत्येकाला त्यांच्या कुळाचारानुसार सकाळी किंवा सायंकाळी गौरींचे आवाहन करता येईल. गौरी स्थापनेसाठी भद्रेचा निषेध नसल्याने भद्रा काळात गौरींची स्थापना करता येईल. महापूजा व नैवेद्यानंतर महालक्ष्मींचे विसर्जन करावे. गुरूवार ३१ आॅगस्ट रोजी मूळ नक्षत्र दिवसभर असल्याने या नक्षत्रावर गौरींचे विसर्जन आपल्या रितीनुसार करावे.
अडीच दिवसांचे माहेरपण
ज्येष्ठा-कनिष्ठा म्हणजेच महालक्ष्मी अडीच दिवसांच्या माहेरपणाला येतात, अशी विदर्भात श्रद्धा आहे. त्यामुळे घरोघरी शुचिर्भूत, प्रसन्न आणि भक्तीपूर्ण वातावरणात त्यांची आराधना केली जाते. भरजरी वस्त्रे, ओट्या, नारळे, प्रसाद आणि महानैवेद्याची नुसती धूम असते. या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
महालक्ष्मी पूजनाचा मुहूर्त
बुधवार ३० आॅगस्ट रोजी गौरीपूजन व महानैवेद्य करावा. या दिवशी ज्येष्ठा नक्षत्र संपूर्ण दिवसभर आहे. दुपारी १२ ते १.३० या काळात राहू काळ असून राहू काळात शुभकार्य वर्ज्य आहे. त्यामुळे राहू काळ सोडून गौरीपूजन व महानैवेद्य करता येईल, अशी माहिती पंडित महेश जोशी यांनी दिली.