२५० ग्रामपंचायतींसाठी आज मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 10:53 PM2017-10-15T22:53:34+5:302017-10-15T22:53:58+5:30
ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत प्रथमच थेट सरपंच निवडला जाणार असल्याने रंगतदार व प्रतिष्ठेच्या प्रचारानंतर सोमवारी उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.
अमरावती : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत प्रथमच थेट सरपंच निवडला जाणार असल्याने रंगतदार व प्रतिष्ठेच्या प्रचारानंतर सोमवारी उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींच्या गावांमध्ये रविवारी मतदान साहित्य पोहचले आहेत.
जिल्ह्यात एकूण २५५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापैकी पाच ग्रामपंचायती अविरोध आल्यामुळे २५० ग्रामपंचायतींमध्ये मतदान होणार आहेत. यावेळी सरपंचपद प्रथमच थेट जनतेमधून असल्यामुळे निवडणुकीला प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. या निवडणुकीत सहा ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी एकच अर्ज दाखल झाला आहे. २४९ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी बहुरंगी लढत आहे. ५०७ सदस्यपदांची अविरोध निवड झाल्याने उर्वरित १,४६१ सदस्यपदासाठी ही निवडणूक होत आहे. मतदानादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी तालुका व पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त लावला आहे. पोलिसांनी अतिरिक्त कुमक बोलावली आहे. निवडणूक प्रक्रियेवर एसडीओ, तहसीलदार यांची कडी नजर आहे.
अचलपूर तालुक्यात २३, चिखलदरा २९, चांदूरबाजार २५, दर्यापूर २०, अंजनगाव १३, चांदूररेल्वे १७, वरूड २३, मोर्शी २४, तिवसा १२, धामणगाव ८, नांदगाव १७, धारणी १८, अमरावती १२, भातकुली ११ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. जिल्ह्यातील निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी ३५५ उमेदवार रिंगणात आहेत.
अमरावती तालुक्यात ९९, भातकुली ८७, नांदगाव खंडेश्वर ११५, तिवसा ९०, चांदूररेल्वे १३१, धामणगाव ५२, दर्यापूर १२५, अंजनगाव सुर्जी ९५, अचलपूर १४५, चांदूरबाजार १७१, मोर्शी १८६, वरूड १७८, धारणी १००, तर चिखलदरा तालुक्यातील १३६ सरपंचांसह सदस्यपदासाठी ही निवडणूक होत आहे.
सोमवार १६ आॅक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. मंगळवार १७ आॅक्टोबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे.