घरी शौचालय तरीही, गावाच्या वेशीवर घाण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:40 AM2020-12-17T04:40:04+5:302020-12-17T04:40:04+5:30
९९ टक्के कुटुंब लाभार्थी, हगणदरीला तिलांजली अमरावती : जिल्ह्यातील ४ लाख १७५ कुटुंबांपैकी ३ लाख ९५ हजार ५५८ ...
९९ टक्के कुटुंब लाभार्थी, हगणदरीला तिलांजली
अमरावती : जिल्ह्यातील ४ लाख १७५ कुटुंबांपैकी ३ लाख ९५ हजार ५५८ कुटुंबांनी शौचालय बांधले. जिल्हा ९९ शौचालयुक्त होऊनही गावाच्या वेशीवर दुर्गंधी पाहायला मिळत असून, हगणदरीमुक्त जिल्हा ही संकल्पना कागदावरच आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्ह्यातील१४ तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून शौचालय वापराबाबत जनजागृती केली जाते. विशेष म्हणजे, बांधकामासाठीसुद्धा शासनाकडून अनुदान दिले जात असल्यामुळे आणि प्रशासनाने शासकीय सुविधांसाठी अट घातल्यामुळे नागरिकांनी शौचालय प्राधान्याने बांधले. तथापि, मेळघाटातील काही गावे तसेच इतरही तालुक्यांतील काही गावांना भेटी दिल्या असता, येथील गावाच्या वेशीवर दुर्गंधी पसरल्याचे दिसून आले. याबद्दल सामाजिक संस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शासनाकडून शौचालय बांधकामासाठी अनुदान देऊन बांधकामे केली असताना, अनेक ग्रामस्थ शौचालय असूनही उघड्यावर शौचास जातात. त्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने पथकांची निर्मिती केली. जनजागृती केली. मात्र, अनेक गावांत उघड्यावर शौचास जाण्याचा प्रकार आजही घडत आहे. परिणामी अनेक गावांच्या वेशीवर घाण आहे. याकरिता खबरदारीच्या उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.
बॉक्स
तालुकानिहाय बांधण्यात आलेली शौचालये
अमरावती २७५८३
अचलपूर ४०३५६
अंजनगाव २१०३६
भातकुली २१९७२
चांदूर बाजार ३७६८३
चांदूर रेल्वे १७७४०
चिखलदरा २२७०५
दयार्पूर ३४५७९
धामणगाव रेल्वे २५१४९
धारणी ३१११७
मोशी ३११६९
नांदगाव खंडेश्वर २५२९१
तिवसा २१६७७
वरूड ३८४२६
बॉक्स
जिल्ह्यात शौचालय नसलेली कुटुंबे
४६१६
शौचालयाचे बांधकाम जिल्ह्यात प्रगतिपथावर
१०९९
बॉक्स
शौचालयात साहित्य
ग्रामीण भागात अनेक कुटुंबांनी शासकीय अनुदानातून शौचालयाचे बांधकाम केले. मात्र, अनेक कुटुंब या शौचालयात विनावापराच्या वस्तू तसेच जळतण भरून ठेवल्याचेही दिसून आले. विशेष म्हणजे, शौचालय असताना अनेक कुटुंब उघड्यावर शौचास जात असल्याचे वास्तव अनेक गावात पहावयास मिळते.
कोट
गावांमध्ये घरोघरी शौचालयाचे बांधकाम करण्यात आली आहेत. त्याचा वापरही बरेच लोक करतात, तर काही जणांनी त्यामध्ये साहित्य भरून ठेवले आहे. काही जण बाथरूम म्हणूनही त्याचा वापर करीत आहेत.
- चंद्रभान घोंगडे, नागरिक
कोट
गावात शंभर टक्के शौचालय बांधण्याचे प्रयत्न केले. काही वाड्या-वस्त्यांवरील कुटुंबीयांकडे शौचालये नाहीत. त्यांनाही बांधण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्याबाबत जनजागृती झाल्यामुळे लोक त्याचा बऱ्यापैकी वापर करीत आहेत.
- प्रदीप गोमासे, माजी सरपंच, घोडगाव