लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी टोकन पद्धत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:13 AM2021-04-28T04:13:56+5:302021-04-28T04:13:56+5:30
अमरावती : कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व अन्य लसीकरण केंद्रांवर नागरिकांची होत असलेली गर्दी टाळण्यासाठी ...
अमरावती : कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व अन्य लसीकरण केंद्रांवर नागरिकांची होत असलेली गर्दी टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेला टोकन पद्धत सुरू करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत सर्व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना सोमवारी दिले.
कोविड-१९ लसीकरणाचा तिसरा टप्पा १ मेपासून सुरू होत आहे. लसीकरणासाठी पात्र असलेल्या नागरिकांची लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. गर्दीच्या ठिकाणी काेरोना विषाणू संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेता, लसीकरण केंद्रावरील व्यवस्थापन सुयोग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे. याअनुषंगाने पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या बैठकीत लसीकरण केंद्रातील गर्दी कमी करून आलेल्या सर्व पात्र लाभार्थींचे लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार लसीकरणासाठी जिल्हा लसीकरण कक्ष, आरोग्य विभागाकडून लस वितरणाची तारीख आणि वेळ निश्चित झाल्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी जिल्हा लसीकरण कक्षाकडून लसी प्राप्त करून घ्यावा, लसीकरण केंद्रावर उपलब्ध होणारा साठा आणि संभाव्य लाभार्थ्याची येण्याची शक्यता लक्षात घेऊन लसीचा पहिला डोज आणि दुसरा डोज घेणाऱ्याकरिता स्वतंत्र व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. लसीकरण केंद्रावर एकाच वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी येणाऱ्या लाभार्थींना लसीकरण केंद्रावरील उपलब्ध साठ्यानुसार जेवढ्या लाभार्थींचे लसीकरण होऊ शकते, ती संख्या निश्चित करून लसीकरण केंद्रावर येण्याच्या वेळेनुसार टोकन क्रमांक द्यावा. प्राप्त लस साठ्यापेक्षा अधिक लाभार्थींना टोकन दिले जाणार नाही, याची दक्षता वैद्यकीय अधिकारी यांनी घेण्याचे निर्देशही अविश्यांत पंडा यांनी दिले आहेत.
बॉक्स
लसीकरणाचे काटेकोर नियोजन करा
ज्या लसीकरण केंद्रावर अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी पूर्वतयारी आणि नियोजन तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील तालुकास्तरीय समितीच्या सल्ल्याने करण्यात यावे तसेच आवश्यक असल्यास पोलीस बंदोबस्त ठेवण्याबाबतची कार्यवाही करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
बॉक्स
- तर नमुने संकलनाचे ठिकाण बदलवा
जिल्ह्यातील काही ठिकाणी कोविड लसीकरण आणि कोविड-१९ नमुना संकलन केंद्रे एकाच आवारात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा ठिकाणी संसर्गाचा धोका लक्षात घेऊन नमुना संकलन केंद्र अन्य ठिकाणी हलविण्यात यावे, जेणेकरून लसीकरणास येणाऱ्या नागरिकांना संसर्गाची बाधा होणार नाही.