‘टोल फ्री’ डेड; व्हॉट्सअॅप बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 10:22 PM2018-09-02T22:22:16+5:302018-09-02T22:22:40+5:30
अनधिकृत जाहिरात व शुभेच्छा फलकांविषयी तक्रार करण्यासाठी महापालिकेकडून दोन टोल फ्री क्रमांक जाहीर केले. त्या दोन्ही टोल फ्री क्रमांकाच्या सेवा विस्कळित आहेत. त्यातील १८००-२३३-६४४१ हा टोल फ्री क्रमांक चक्क ‘डेड’ असल्याचे आढळले. तर अन्य एक टोल फ्री क्रमांकावर रिंग जात असली तरी तो पलिकडून उचलला जात नाही. त्यामुळे महापालिकेने तक्रारीसाठी बंद असलेले क्रमांक प्रसिध्द करुन उच्च न्यायालायाच्या आदेशाची कागदी खानापुर्ती तर केली नसावी ना? अशी शंका उपस्थित झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अनधिकृत जाहिरात व शुभेच्छा फलकांविषयी तक्रार करण्यासाठी महापालिकेकडून दोन टोल फ्री क्रमांक जाहीर केले. त्या दोन्ही टोल फ्री क्रमांकाच्या सेवा विस्कळित आहेत. त्यातील १८००-२३३-६४४१ हा टोल फ्री क्रमांक चक्क ‘डेड’ असल्याचे आढळले. तर अन्य एक टोल फ्री क्रमांकावर रिंग जात असली तरी तो पलिकडून उचलला जात नाही. त्यामुळे महापालिकेने तक्रारीसाठी बंद असलेले क्रमांक प्रसिध्द करुन उच्च न्यायालायाच्या आदेशाची कागदी खानापुर्ती तर केली नसावी ना? अशी शंका उपस्थित झाली आहे.
दोन्ही टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविणे शक्य नसताना एसएमएस व व्हॉट्सअॅपद्वारे तक्रारीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेला ९९७०००१३१२ हा भ्रमणध्वनी क्रमांक तात्पुरता सेवेत नाही, असे पालूपद लावतो. याच क्रमांकावर व्हाट्अॅपच्या माध्यमातून तक्रार केल्यास ‘ द एन्टर्ड कोड इज नॉट व्हॅलिड , प्लिज एन्टर्ड व्हॅलिड कोड अर्थात केलेली तक्रारीचा कोड वैध नाही, कृपया वैध कोड टाकण्याची सूचना करण्यात येते. मात्र, वैध कोड दिला जात नाही. वारंवार वैध कोड टाकण्याची सूचना या आॅटोमेटेड सेवेतून केली जाते, त्यामुळे टोल फ्री बंद व भ्रमणध्वनीवरील आॅटोमॅटिक सुविधेवर तक्रारच नोंदविता येत नाही, असा अजब प्रकार उघड झाला आहे. दोन्ही प्रकाराने महापालिका अनधिकृत जाहिराती व शुभेच्छा फलकांबाबतच्या तक्रारीविषयी किती गंभीर आहे, हे अधोरेखित झाले. महापालिका क्षेत्रात अनधिकृतपणे जाहिराती व शुभेच्छा फलक लावणाऱ्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींविरुद्ध आता फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. तथापि उच्च न्यायालायाने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींविरुद्धही गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिल्याने महापालिकेकडूनही तसे प्रसिध्दीपत्रक काढले होते. त्यात दर्शविलेल्या क्रमांकावरून महापालिकेची लक्तरे वेशिवर टांगली गेली. दाखल जनहित याचिकेवर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत जाहिरातींबाबत कडक धोरण अवलंबविण्याचे निर्देश सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले. त्यानुसार, अमरावती महापालिका क्षेत्रातील अनधिकृत जाहिरातीसंबंधी नागरिकांना तक्रार करता यावी, यासाठी १८००-२३३-६४४० व १८००-२३३-६४४१ हे दोन टोल फ्री क्रमांक जाहीर केले आहे. ९९७०००१३१२ या भ्रमनध्वनीवर एसएमएस व व्हॉट्सअॅपद्वारे तक्रारी नोंदविण्याची सुविधा महापालिकेने उपलब्ध करुन दिल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते. महापालिका क्षेत्रात जाहिराती व शुभेच्छा फलक लावताना संबंधित जागामालक तसेच शासकीय यंत्रणेचे नाहरकत घ्यावी, महापालिकेकडे परवानगीसाठी अर्ज करावा, व शहर पोलीस वाहतूक शाखेची नाहरकत प्राप्त झाल्यानंतरच संबंधितास परवानगी देण्यात येईल, असे आवाहन महापालिकेचे उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी केले होते. परंतु टोल फ्री क्रमांक अस्तिवातच नसल्याने महापालिकेचा अजब कारभार चव्हाट्यावर आला आहे.
कार्यालय स्थांनातरित करण्यात आल्याने टोल फ्री सेवा विस्कळित झाली. त्याबाबत अधिनिस्थ यंत्रणेला जाब विचारू. टोल फ्री अद्ययावत सुरू करण्यासाठी बीएसएनएलशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
- निवेदिता घार्गे, अधीक्षक बाजार परवाना