टोमॅटो विक्रेते कमावतायत १०० टक्के नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 01:50 PM2019-05-30T13:50:35+5:302019-05-30T13:51:42+5:30
उन्हाचा पारा वाढल्याने काही भाज्यांची आवक कमी होत आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव वधारले आहेत. सद्यस्थितीत टोमॅटोचे दर चढीचे आहेत. किरकोळ व्यावसायिकांनी याचाच फायदा घेऊन कृत्रिम भाववाढ केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : उन्हाचा पारा वाढल्याने काही भाज्यांची आवक कमी होत आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव वधारले आहेत. सद्यस्थितीत टोमॅटोचे दर चढीचे आहेत. किरकोळ व्यावसायिकांनी याचाच फायदा घेऊन कृत्रिम भाववाढ केली आहे. टोमॅटोची ठोक विक्री २८ ते ३२ रुपये प्रतिकिलो होत असताना, किरकोळ विक्री ५० ते ६० रुपये प्रतिकिलोने होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. किरकोळ व्यावसायिक यातून शंभर टक्के नफा कमावित आहेत. सदर भाव सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचे झाले आहेत.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळे व भाजीबाजारात बुधवारी केवळ ४० क्विंटल टोमॅटोची आवक झाली. जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले टोमॅटो बाजार समितीत विक्रीसाठी आणण्यात आणले होते. बुधवारी टोमॅटोला प्रतिक्विंटल कमीत कमी २८०० ते जास्तीत जास्त ३२०० रुपये भाव मिळाला. मंडईतून किरकोळ व्यापाऱ्यांनी तो खरेदी करून शहरातील गल्ली बोळात हातगाड्याद्वारे घरोघरी विक्री करताना मात्र दुप्पट दर आकारून शंभर टक्के नफा मिळवित आहेत. मागील आठवड्यात १८०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे टोमॅटोला भाव मिळाला होता. त्यातुलनेत आता आवक कमी झाल्यामुळे भाववाढ झाली आहे. त्याचा फायदा किरकोळ व्यापारी घेत असल्याचे दिसून येत आहे.
४५५ क्विंटल बटाट्याची आवक
कांदा व बटाट्याची सर्वाधिक आवक बाजार समितीत रोज होते. त्याची सर्वाधिक मागणीसुद्धा असते. बुधवारी ४५५ क्विंटल बटाट्यांची आवक झाली आहे. त्याला ६०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आहे. गावरान कांद्याची आवक ५०५ क्विंटल, तर नाशिकच्या कांद्याची आवक २४५ क्विंटल झाल्याची माहिती फळ व भाजीबाजार विभागाने दिली आहे.