चांदूर रेल्वे बी झोनमधून टोम्पे कॉलेजची टीम विजयी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 06:37 PM2018-10-11T18:37:47+5:302018-10-11T18:46:33+5:30
८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे स्थानिक स्व. मदनगोपाल मुंधडा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत चांदूर रेल्वे 'झोन बी'मधून अंतिम सामन्यात चांदूर बाजार येथील टोम्पे महाविद्यालयाच्या चमूने बाजी मारली.
८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान आयोजित क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश शिंगटे यांच्या हस्ते व प्राचार्य जयंत कारमोरे यांच्या अध्यक्षतेत झाले. अमरावती, चांदूर रेल्वे, आसेगाव पूर्णा, शेंदूरजना घाट, चांदूर बाजार, मोर्शी, नांदगाव पेठ, पिंपळखुटा, वरुड, नेरपिंगळाई, कुऱ्हा, बडनेरा, तिवसा, भातकुली, धारणी, जरूड, वलगाव आदी येथील महाविद्यालयीन चमू सहभागी झाल्या होत्या. उपांत्य सामना श्रीराम कॉलेज कुऱ्हा विरूद्ध केशरबाई लाहोटी महाविद्यालय अमरावती यांच्यात झाला. यात केशरबाई लाहोटी महाविद्यालयाने बाजी मारली. दुसरी लढत टोम्पे कॉलेज चांदूर बाजार विरुद्ध डीसीपीई एचव्हीपीएम कॉलेज अमरावती यांच्यात झाली. यामध्ये टोम्पे कॉलेज चांदूर बाजार विजयी झाली. यानंतर केशरबाई लाहोटी कॉलेज व टोम्पे कॉलेज यांच्यात झोनमधील अंतिम सामना झाला. यामध्ये टोम्पे कॉलेजने दणदणीत विजय प्राप्त केले.
आता चार झोनमधून चार विजयी संघाचे उपांत्य व अंतिम सामना होणार असुन त्यानंतर विद्यापीठातुन विजयी संघ ठरणार आहे. सदर स्पर्धांकरिता प्राचार्य जे.डी. कारमोरे यांच्यासह शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालिका आणि क्रीडा स्पर्धेच्या आयोजिका डॉ. अलका करनवाल यांसह प्राध्यापक, कर्मचारी वृंद, विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. व्हॉलीबॉल स्पर्धांचे परीक्षण महाराष्ट्र व्हॉलीबॉल रेफरी बोर्डचे सदस्य संजय बढे आणि संजय देशमुख यांनी केले.
अमरावती विद्यापीठातर्फे आयोजित आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत अकोला, चांदूर रेल्वे, बुलडाणा आणि यवतमाळ यांच्यात होणार आहे. चारही विभागांमधून विजयी ठरणाऱ्या संघात अंतिम सामना १४ आॅक्टोबरला मुंधडा महाविद्यालयातच होईल. जिंकणाऱ्या संघास फिरता चषक विद्यापीठाकडून देण्यात येणार आहे. याशिवाय संपूर्ण विजय संघातून आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी चमूची निवड चाचणी मुंधडा महाविद्यालयातच १५ ते १७ आॅक्टोबर दरम्यान होईल.