२०२ गावांना कृषी संजीवनीचे टॉनिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 10:12 PM2018-04-28T22:12:43+5:302018-04-28T22:14:10+5:30
लहान शेतकऱ्यांची शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी जिल्ह्यात जागतिक बँकेच्या सहकार्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची (पोखरा) उपलब्धी आहे. पहिल्या टप्प्यात १२ गावसमूहाची निवड करण्यात आली. यामध्ये एकूण २०२ गावांचा समावेश करण्यात आला. प्रकल्पामध्ये समाविष्ट ५३२ गावांमध्ये येत्या सहा वर्षांत शाश्वत विकास साध्य करण्याचे आव्हान आहे.
गजानन मोहोड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लहान शेतकऱ्यांची शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी जिल्ह्यात जागतिक बँकेच्या सहकार्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची (पोखरा) उपलब्धी आहे. पहिल्या टप्प्यात १२ गावसमूहाची निवड करण्यात आली. यामध्ये एकूण २०२ गावांचा समावेश करण्यात आला. प्रकल्पामध्ये समाविष्ट ५३२ गावांमध्ये येत्या सहा वर्षांत शाश्वत विकास साध्य करण्याचे आव्हान आहे. यामध्ये खारपाणपट्यामधील ३५६, तर दुष्काळजन्य असणाऱ्या १७६ गावांचा समावेश आहे.
पोखरा प्रकल्पात लहान क्षेत्रातील शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाशी जुळवून घेऊन सक्षम करण्यावर भर देण्यात आला. प्रकल्पांतर्गत गावसमूहातील प्रत्येक गावाचे सूक्ष्म नियोजन आराखडे तयार करून ग्रामसभेच्या मान्यतेने व सरपंचाच्या अध्यक्षतेखालील कृषी संजीवनी समितीद्वारे गावात कामे सुरू करण्याचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला आहे. प्रायोगिक तत्त्वावर ३३ ग्राम कृषी संजीवनी समित्या स्थापित करण्यात आल्या. हवामान बदलास अनुसरून कृषी पद्धती विकसित करणे, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादकतेत वृद्धी, कृषिमूल्य साखळीमध्ये सहभाग, आर्थिकदृष्ट्या किफायतशीर शेती होण्यासाठी प्रयत्न करणे हा प्रकल्पाचा उद्देश आहे.
शेतीसाठी या घटकांवर भर
क्षारपड व चोपण जमिनीचे व्यवस्थापन, संरक्षित शेती, पाण्याचा कार्यक्षम व शाश्वत पद्धतीने वापर, भूजल पुनर्भरण, काढणीपश्चात व्यवस्थापन, शेतकरी उत्पादक कंपन्यांना शेतीमालाचे संकलन, हाताळणी, मूल्यवृद्धी-विक्री आदीबाबत सहाय्य, बियाणे वितरण प्रणालीची कार्यक्षमता वृद्धिंगत करणे, पीक पद्धतीत बदल करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे, पिकांचे हवामानाकूल वाण विकसित करणे आदी घटक आहेत.
शेतीवर उपजीविका असणाऱ्यांना लाभ
केवळ शेतीवर उपजीविका असलेल्या अत्यल्प व अल्प भूधारकांना आणि भूमिहीन शेतमजुरांना लाभ देण्यात येणार आहे. लाभार्थींची निवड अनुसूचित जाती व जमाती, महिला, दिव्यांग व सर्वसाधारण या प्राधान्यक्रमानुसार करण्यात येईल. प्रथम अत्यल्प भूधारक व निधी शिल्लक राहिल्यास अल्पभूधारकाची निवड करण्यात येणार आहे.
पाण्याचा कार्यक्षम, शाश्वत वापर
मूलस्थानी जलसंधारण, ओघळीवरचे उपचार, पाणी साठवण संरचनांची निर्मिती, जुन्या जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन, भूजल पुनर्भरण, सूक्ष्म सिंचन व संरक्षित सिंचन सुविधेवर भर देण्यात येणार आहे.
हवामानाकुल शेती पद्धती
हवामानानुकूल कृषी पद्धतीमध्ये आधुनिक शेती तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके, जमिनीमध्ये कर्ब ग्रहणाचे प्रमाण वाढविणे, क्षारपड व चोपण जमिनीचे व्यवस्थापन, संरक्षित शेतीसह एकात्मिक शेती पद्धतीवर भर देण्यात येणार आहे.
काढणीपश्चात व्यवस्थापन
शेती उत्पादक कंपन्यांचे सक्षमीकरण, क्षमता बांधणी, बाजार व्यवस्थेशी सांगड निर्माण करणे, भाडे तत्त्वावर कृषी औजारे केंद्र-सुविधा निर्मिती करण्यात येणार आहे.