वन विभागातील ‘टॉप अप’ मॉडेल अडचणीत; प्रधान सचिवांविरुद्ध असंतोष?
By गणेश वासनिक | Published: December 24, 2023 06:19 PM2023-12-24T18:19:19+5:302023-12-24T18:19:54+5:30
वनबल प्रमुखांनी शासनाकडे समितीचा अहवाल केला सादर, ‘टॉप टू बॉटम’ वनकर्मचाऱ्यांमध्ये अभिसरण योजनेला विरोध
अमरावती : वने आणि वन्यजीव संरक्षणाच्या कामात मग्रारोहयो-अभिसरण योजना आणण्याचा घाट रचला असताना या योजनेस प्रचंड विरोध होत आहे. त्यामुळे नेमण्यात आलेल्या समितीने ‘टॉप अप’ मॉडेलमध्ये प्रचंड त्रुटी काढल्या असून समितीचा अहवाल राज्याचे वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर यांनी राज्य शासनाकडे सादर केला आहे. त्यामुळे आता शासन कोणता निर्णय घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
वन्यजीव संरक्षण संवर्धनाच्या कामामध्ये मग्रारोहयो योजना अशी सरमिसळ करून अभिसरण (टॉप अप) प्रकारची नवीन योजना वन विभागाच्या प्रधान सचिवांनी वन विभागात तात्काळ राबविण्याचे निर्देश दिले होते. वास्तविकत: वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे मत लक्षात न घेता सरसकट टॉप अप राबविण्यावर जोर दिल्यानंतर या योजनेला ‘टॉप टू बॉटम’ विरोध झाला.
वन विभागातील कनिष्ठ- वरिष्ठ वनाधिकारी आमने-सामने आल्याचे चित्र निर्माण झाल्यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘टॉप अप’ मॉडेलचा सर्वंकष अभ्यास करण्यासाठी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक पी. कल्याणकुमार यांच्या अध्यक्षतेत १२ सदस्यांची एक समिती नियुक्त केली होती. या समितीने आठवड्याभरात अभ्यास करून अहवाल वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर यांच्यामार्फत शासनास सादर केला आहे.