वादळी पावसाने अमरावती शहराला झोडपले; ५० वर झाडे कोसळली, महायुतीचे प्रचार कार्यालय झाले भुईसपाट
By उज्वल भालेकर | Updated: April 13, 2024 19:23 IST2024-04-13T19:23:17+5:302024-04-13T19:23:32+5:30
यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे चित्र शहरात दिसून आले.

वादळी पावसाने अमरावती शहराला झोडपले; ५० वर झाडे कोसळली, महायुतीचे प्रचार कार्यालय झाले भुईसपाट
अमरावती : शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास शहरात वादळी पावसाने शहराला झोडपले. शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय, खापर्डे बगिचा, मुख्य बसस्थानक परिसर, रेल्वे स्टेशन परिसरातील ५० पेक्षा अधिक झाडांची पडझड झाली आहे. तसेच रेल्वे स्टेशन परिसरातील महायुतीच्या उमेदवाराचे प्रमुख प्रचार कार्यालय तसेच खापर्डे बगिचा परिसरातील अपक्ष उमेदवाराचे प्रचार कार्यालय भुईसपाट झाले आहे. तसेच महावितरणचेही मोठ्या प्रमाणावर विद्युत तारा तुटल्याने नुकसान झाले आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे चित्र शहरात दिसून आले.
मागील चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू आहे. ९ एप्रिलला झालेल्या वादळी पावसामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे तसेच हजारो घरांचीदेखील पडझड झाली होती, तर अशातच शनिवारी शहरात पहाटे ४ च्या सुमारास वादळी पाऊस कोसळला. यावेळी आलेल्या चक्रीवादळामुळे शहरातील काही भागांमध्ये झाडांची पडझड झाली. तसेच शहरातील मोठे-मोठे होल्डिंगदेखील कोसळले. महापालिका प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार जिल्हा सामान्य रुग्णालयासमोरील एका इमारतीवर असलेले मोठे होर्डिंग कोसळले.
हे होल्डिंग काढण्यासाठी तीन ते चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर हे होर्डिंग खाली काढण्यात महापालिका प्रशासनाला यश आले. तसेच शहरातील ५० च्या जवळपास मोठी झाडेदेखील कोसळल्याने काही शहरातील काही प्रमुख मार्गावरील वाहतूकही ठप्प पडली होती. यावेळी महापालिका आयुक्त देवीदास पवार यांनी स्वत: सकाळी इर्विन चौक परिसरात भेट देत तातडीने पडलेली झाडे मोकळे करण्याचे तसेच होर्डिंग काढण्याचे निर्देश दिले होते. यावेळी उद्यान विभाग, अतिक्रमण विभाग, अग्निशमन विभाग, बांधकाम विभाग, स्वच्छता विभाग यांनी संयुक्त कारवाई करून सदर परिस्थिती नियंत्रणात आणली.
इर्विन रुग्णालयालाही वादळाचा फटका
जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनालादेखील वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे. रुग्णालय परिसरातील मोठ-मोठी चार ते पाच झाडे उन्मळून पडली. एक झाड ऑटोरिक्षेवर काेसळल्याने ऑटोचे नुकसान झाले. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक आणि रुग्णालयातील लॅबला जोडणाऱ्या पॅसेजचे टिनाचे छप्परदेखील उडाले आहे.