प्रेमाच्या जाळ्यात ओढून छळ; त्रस्त विद्यार्थिनीने घेतले विष
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 12:14 PM2023-11-04T12:14:25+5:302023-11-04T12:18:45+5:30
पुण्याच्या प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा, महिनाभरानंतर घटना उघड
अमरावती : प्रेमात झालेला ब्रेकअप व प्रियकराने केलेल्या अनन्वित छळाला कंटाळून एका कॉलेजवयीन तरुणीने विष घेऊन आत्महत्या केली. २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ ते ६.३० च्या सुमारास ती घटना घडली. राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ती भाड्याने राहत होती. तेथेच तिने अखेरचा श्वास घेतला. रक्षा (२२) असे मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी मृत रक्षाच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपी संजय जाधव (रा. पुणे) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.
यवतमाळ जिल्ह्यातील नेरपरसोपंत तालुक्यातील मूळ रहिवासी असलेली एक तरुणी अन्य एका मैत्रिणीसोबत राजापेठ हद्दीतील गोविंदनगर येथे एका ठिकाणी भाड्याने राहत होती. पोलिस सूत्रानुसार, तिच्यात व संजय जाधव यांच्यात ओळखी झाली. आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिचा गैरफायदा घेऊन तिला मानसिक त्रास दिला. त्यामुळे ती अलीकडे विमनस्क स्थितीत राहू लागली. अशातच तिने रूममेट नसल्याची संधी साधत खोलीवरच विषारी औषध प्राशन केले. ही घटना उजेडात येताच तिला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिचे प्राण वाचू शकले नाहीत. याबाबत तिच्या वडिलांना कळविण्यात आले. त्यांनी गुरुवारी रात्रीच अमरावती गाठले.
मैत्रिणीने सांगितले वास्तव
रक्षाचे वडील येथे पोहोचल्यानंतर ते सैरभैर झाले. अभ्यासात अतिशय हुशार व ध्येयाप्रति समर्पित असलेल्या पोटच्या गोळ्याने असा टोकाचा निर्णय का घेतला, या विवंचनेत ते अडकले. मात्र, त्यांची ती विवंचना रक्षाच्या रूममेट मुलीने दूर केली. संजय जाधव यानेच तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तथा तिचा गैरफायदा घेऊन तिला मानसिक त्रास दिला. त्यामुळे तिने आत्महत्या केली असावी, असे तिने रक्षाच्या वडिलांना सांगितले. त्यानंतर रक्षाच्या वडिलांनी राजापेठ पोलिस ठाणे गाठून आरोपी संजय जाधव याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.
मैत्रिणीचे बयाण अन् रक्षाचे कॉल डिटेल्स तपासणार
रक्षाच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. आता तपासादरम्यान तिच्या मैत्रिणीचे बयाण घेतले जाणार आहे. मृत रक्षाचा मोबाइल सीडीआरदेखील तपासला जाईल. त्यातून त्यांच्यात किती दिवसांपासून प्रेमप्रकरण होते व अन्य बाबींचा उलगडा होणार असल्याची माहिती राजापेठच्या ठाणेदार सीमा दाताळकर यांनी ‘लोकमत’ला दिली.