जीवघेण्या रस्त्यावरून खडतर प्रवास
By admin | Published: January 3, 2016 12:42 AM2016-01-03T00:42:49+5:302016-01-03T00:42:49+5:30
तालुक्यातील जिल्हा परिषदेत बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.
वाहन चालकांमध्ये तीव्र रोष : अनेक रस्ते गेले खड्ड्यात
चांदूरबाजार : तालुक्यातील जिल्हा परिषदेत बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्यांचे काम काही महिन्यांपूर्वीच झाले असतानाही त्या रस्त्याचेसुद्धा बारा वाजले आहे. त्यामुळे या रस्त्यांवर वाहनचालकाला वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघाताच्याही प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे जि. प. बांधकाम विभागाबाबत वाहन चालकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे.
तालुक्यातील जसापूर ते निंबोरा रस्त्याचे काम दीड वर्षापूर्वी झाले असताना रस्ता उखडू लागला आहे. रस्ता एका बाजूने दबणेसुद्धा सुरू झाले आहे. लाखनवाडी ते करजगाव रस्त्यावर जि. प. अंतर्गत ६० लक्ष रूपये खर्च करण्यात आले. मात्र दीड वर्षातच या रस्त्याचे धिंडोळे निघाले. चांदूरबाजार ते जसापूर या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. कोदोरी ते काजळी रस्त्याचे बांधकाम १८ जून २०११ रोजी पूर्ण झाले होते. आज याची दुर्दशा झाली आहे. ठिकठिकाणी या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. जसापूर ते कोदोरी रस्त्यावरील खड्ड्यांनी तर कहरच केला आहे. याच रस्त्यावर पूर्णा प्रकल्पामधून सिंचनाकरिता सोडण्यात येत असलेल्या कालव्यातील अतिरिक्त पाणी या रस्त्यावरून वाहत असल्याने रस्ता खरडून गेला. जिल्हा परिषदेत बांधकाम विभाग निद्रावस्थेतच आहे.
कामाचे फलक गायब
कोणतेही काम करण्यापूर्वी काम कोणत्या निधीमधून मंजूर आहे, कामावर किती रूपये खर्च मंजूर आहे. कामाचा कालावधी, कामाचे अंतर किती व कंत्राटदाराचे नाव असे फलक लावणे आवश्यक असते. मात्र कामाबाबत सर्वसामान्यांना माहिती होऊ नये व कामातील काही मलीदा आपल्याला खाता यावा, या उद्देशाने असे कामाचे फलक लावणेसुद्धा बंद झाले आहे.
पावसाळ्यापूर्वीच खड्डे बुजविले गरजेचे
पावसाळ्यापूर्वी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविणे आवश्यक असते. कारण पाऊस आल्यानंतर ते खड्डे बुजविणे अशक्य आहे. तसेच पाणी साचून राहत असल्याने वाहनधारकांना त्याचा अंदाज लागत नाही. परिणामी अपघाताला सामोरे जावे लागते.