पर्यटन व्यवसायाला फटका, शेकडोंचा रोजगार बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:10 AM2021-07-02T04:10:14+5:302021-07-02T04:10:14+5:30
फोटो - ०१एएमपीएच०१ - कोरोनापूर्वीची हत्ती सफारी ०१एएमपीएच०२ - पर्यटनबंदीनंतर बेरोजगार झालेले जिप्सीचालक ०१एएमपीएच०३ - पर्यटनबंदीनंतर बेरोजगार झालेले जिप्सीचालक ...
फोटो - ०१एएमपीएच०१ - कोरोनापूर्वीची हत्ती सफारी
०१एएमपीएच०२ - पर्यटनबंदीनंतर बेरोजगार झालेले जिप्सीचालक
०१एएमपीएच०३ - पर्यटनबंदीनंतर बेरोजगार झालेले जिप्सीचालक
०१एएमपीएच०४ - कोरोनापूर्वीची जिप्सी सफारी
०१एएमपीएच०५ - मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे बंद करण्यात आलेले गेट
----------------------------------------------
मेळघाट, ज्ञानगंगा, लोणार, काटेपूर्णा, टिपेश्वर येथे पर्यटकांना नो एन्ट्री : गाईड, जिप्सी, हॉटेल व्यवसाय ठप्प, शेकडो कुटुंबांचा आर्थिक डोलारा कोसळला
नरेंद्र जावरे - चिखलदरा (अमरावती) : कोरोनामुळे देशभरातील विविध जिल्हे, राज्य अनलॉक झाले. मात्र, व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना प्रवेश बंद आहे. जंगल सफारी, गड-किल्ले, हत्ती सफारी बंद आहे. पर्यटक बंदीमुळे येत नसल्याने यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे शेकडो लहान-मोठे व्यावसायिक दोन वर्षांत यंदा सर्वाधिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्याची झळ मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील लोणार, काटेपूर्णा, टिपेश्वर, ज्ञानगंगा येथील पर्यटन व्यवसायाला बसली आहे.
राज्यातील सहापैकी पाच व्याघ्र प्रकल्प विदर्भात आहेत. त्याच्या बळावर अर्थार्जन करणारे गाईड, जिप्सी चालक, छोटे दुकानदार, हॉटेल व्यावसायिक आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. त्यामुळे वनपर्यटनाला परवानगी देण्याची मागणी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी एका पत्राद्वारे केली. त्यानंतर तीन दिवस चिखलदरा येथे तीन दिवस जंगल सफारी सुरू झाली व पुन्हा बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. पंधरा दिवस डेल्टाचा प्रकोप काय येतो, त्यानंतरच व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनासाठी परवानगी दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बॉक्स
३०५ गाईड, १०० जिप्सीचालक, ३०० छोटे दुकानदार आर्थिक अडचणीत
मेळघाट, ज्ञानगंगा, लोणार, काटेपूर्णा, टिपेश्वर आणि पैनगंगा येथे एकूण ३०५ गाईड आहेत. त्यामध्ये चिखलदऱ्यात ३०, सेमाडोह २० आमझरी १०, हरिसाल ३, चौराकुंड १०, ढाकणा १०, शहानूर ५२, वसाली २५, काटेपूर्णा ११, ज्ञानगंगा ४०, लोणार २४, पैनगंगा ५०, टिपेश्वर येथे ४७ अशी गाईडची संख्या आहे. चिखलदरा येथे ५०, सेमाडोह येथे ८, ज्ञानगंगा येथे १०, शहानूर येथे ८, टिपेश्वरमध्ये २० अशा शंभरावर जिप्सी असून, चहा टपरी, भजी, मक्याचे कणीस, वेफर्स अशी लहान-मोठे ३०० वर दुकाने आहेत.
मेळघाट, ज्ञानगंगा, लोणार, काटेपूर्णा, टिपेश्वर आणि पैनगंगा तसेच चिखलदरा येथील लहान-मोठे दुकानदार, गाईड, हॉटेल व्यावसायिक, जिप्सी चालक आदी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दुसरीकडे कोलकास येथे हत्ती सफारी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागामार्फत २०१७ पासून सुरू आहे. तीसुद्धा बंद झाल्याने पर्यटकांची ओढ मंदावली आहे
बॉक्स
मेळघाटात सहा वर्षांत लाखो पर्यटक, कोट्यवधीचे उत्पन्न
वर्ष पर्यटक उत्पन्न
२०१५-१६ ४५९१८ ४८०४५०३
२०१६-१७ ५१३६४ ६७,४११२०
२०१७-१८ ५४५०३ ७१८१०५३
२०१८-१९ ५५९८५ १,२८,९८४३२
२०१९-२० ११३४१४ १,७५,५९५४६
२०२०-२१ ९७४७६ २,५०२६५६१
२०२१-२२ १८०० ४.७२२७०
(२१मे पर्यंत)
बॉक्स
शुभम म्हणतो, मित्रांच्या मदतीने आणली जिप्सी
विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटन स्थळावर शुभम देवळेकर या युवकाने पूर्वी मित्रांकडून पाच, दहा-वीस हजार अशी लाख रुपयांची रोख उसनी घेतली. घरातली काही सोने विकून पावणेदोन लक्ष रुपयांची जिप्सी आणली. त्यातून मिळकत मिळाल्यावर मित्रांचे देणे फेडू, असा त्याचा अंदाज होता. कोरोना लॉकडाऊनने तो फोल ठरला. पर्यटक नसल्याने स्वतःची जिप्सी रिकामी ठेवून तो नेहमीप्रमाणे दुसऱ्यांकडे चालकाची नोकरी करीत कर्जफेड करीत असल्याचे त्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. असे अनेक युवक आहेत, जे व्याजाने वाहन व इतर व्यवसायासाठी कर्ज काढून आहेत.
कोट
व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना प्रवेशबंदी आहे. मेळघाट, काटेपूर्णा, पैनगंगा, टिपेश्वर, लोणार सर्वच ठिकाणी असलेल्या गाईड, जिप्सीचालक, हॉटेल व्यवसाय करणाऱ्या शेकडो बेरोजगार युवकांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
- स्वप्निल बागडे, पर्यटन व्यवस्थापक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती
कोट
कर्ज काढून जिप्सी घेऊन व लहान-मोठे दुकान थाटून बेरोजगार युवकांनी स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न केला. परंतु, पर्यटनबंदीमुळे अनेकांच्या परिवारावर आर्थिक अरिष्ट कोसळले आहे.
- शुभम देवळेकर, जिप्सी चालक, चिखलदरा