विदर्भातील पर्यटनस्थळे पुन्हा एकदा गजबजली, व्याघ्र दर्शनाने पर्यटक सुखावले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 02:48 AM2021-01-11T02:48:12+5:302021-01-11T02:48:33+5:30
व्याघ्र दर्शनाने पर्यटक सुखावले
लॉकडाऊनमध्ये घरात थांबून कोंडमारा झालेली माणसं आता घरापासून दूर कुठेतरी भटकण्यासाठी आतुर झाली आहेत. ख्रिसमसपासून लोक फिरायला बाहेर पडत आहेत. थंड हवेची ठिकाणे व समुद्रकिनारे गर्दीने फुलले आहेत. त्याच वेळी महाराष्ट्रात वाघाच्या दर्शनाचे हक्काचे ठिकाण असलेल्या विदर्भातील व्याघ्र प्रकल्पातही मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. अनलॉकनंतर विदर्भात फुललेल्या वन पर्यटनाचा घेतलेला हा आढावा...
ताडोबाची जंगल सफारी जोरात
चंद्रपूर : कोराेनाच्या दहशतीने पर्यटस्थळे ओस पडली होती. आता ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला पर्यटक पसंती देत आहेत. ताडोबाची ऑनलाइन बुकिंग फुल्ल असल्याचे बघायला मिळत आहे. अलीकडेच मुंबईतील अमेरिकी वकिलातीचे प्रमुख डेव्हिड रॅन्झ ताडोबात तीन दिवसांच्या मुक्कामाला होते. माया आणि तारा या वाघिणींच्या कुटुंबाने त्यांना भुरळ घातली. हमखास व्याघ्र दर्शन ही येथील खासियत आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला २० हजार पर्यटकांची भेट
नरेंद्र जावरे
चिखलदरा (अमरावती) : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटनासह विदर्भाचे पर्यटनस्थळ असलेल्या चिखलदऱ्यात अनलॉकनंतर सव्वा लाख पर्यटकांनी हजेरी लावली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित जंगलात पर्यटकांची संख्या आता वीस हजारांपेक्षा अधिक झाली आहे. वाघासह बिबटे, रानगवे, सांबर, हरिण हे वन्यप्राणी मेळघाटच्या जंगलाची ओळख आहेत. चिखलदरा पर्यटनस्थळावरून वैराट व सेमाडोह या ठिकाणी जंगल सफारीसाठी जिप्सी वाहनांची व्यवस्था आहे. वैराट जंगल सफारीचे अंतर १७ किलोमीटर आहे. या परिसरात वाघासह इतर मांसभक्षी व तृणभक्षी प्राण्यांचे दर्शन होते.
आकर्षणाची केंद्रे
ताडोबात पर्यटकांसाठी व्याघ्र दर्शनासह ॲडव्हेंचर नेचर ट्रॅक, बर्ड वाॅचिंग, बटरफ्लाय गार्डन, सायकलिंग, डायरोमा, राफ्टिंग, बोटिंग, मचाण स्टे, लाँग हट स्टे ही आकर्षणाची केंद्रे आहेत. ज्यांना कोअरची सफारी करणे शक्य झाले नाही, त्यांच्यासाठी बफर सफारीचाही पर्याय उपलब्ध आहे. बफरमध्येही व्याघ्र दर्शनाचा आनंद पर्यटक लुटत आहेत. नाइट सफारीही पर्यटकांना भुरळ घालत आहे.
हमखास व्याघ्र दर्शन
n चिखलदरा व सेमाडोह येथे येणारे पर्यटक निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासोबतच सर्वाधिक अपेक्षा व्याघ्र दर्शनाची ठेवतात.
n अनेक गावांचे पुनर्वसन झाल्याने, तेथे गवती कुरणक्षेत्र तयार झाले आहे. परिणामी, तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढली आहे. त्यातूनच व्याघ्र दर्शन पर्यटकांना होत आहे.