सेल्फीच्या नादात पर्यटक गमावतात जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:16 AM2021-09-14T04:16:18+5:302021-09-14T04:16:18+5:30
पर्यटनाला या, पण जिवाची काळजी घ्या नरेंद्र जावरे- चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन चिखलदऱ्याला दरवर्षी हजारोंच्या संख्येने पर्यटक भेटी देतात. ...
पर्यटनाला या, पण जिवाची काळजी घ्या
नरेंद्र जावरे- चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन चिखलदऱ्याला दरवर्षी हजारोंच्या संख्येने पर्यटक भेटी देतात. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे जून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत पर्यटकांची संख्या लाखावर असते. कोसळलेल्या पावसामुळे नदी-नाले आणि एकूणच पहाडावरून कोसळणारे धबधबे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरतात. परंतु, याच धबधब्याच्या पुढ्यात सेल्फीचा अतिमोह, पोहणे येत नसताना आंघोळीचा नाद जिवावर बेतणारा ठरत आहे. दोन महिन्यात सात पर्यटकांना यात जीव गमवावा लागला.
सातपुडा पर्वतरांगेत वसलेले चिखलदरा पर्यटनस्थळ समुद्रसपाटीपासून ३ हजार ६०० फूट उंचावर आहे. परतीचा पाऊस चांगला झाल्याने जवळपास सर्वच धबधबे वाहू लागले आहेत. त्यामुळे पर्यटकांची संख्याही वाढली आहे. मात्र, सेल्फीच्या मोहात अनेक जण जीव धोक्यात घालताना दिसत आहेत.
चिखलदरा पर्यटनस्थळावर बाराशे मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये दोन लाखांवर पर्यटक आल्याने २८ लक्ष रुपयांच्या जवळपास नगरपालिकेला पर्यटन आणि वाहन करातून उत्पन्न मिळाले असल्याची माहिती मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांनी दिली.
box
1पर्यटनाला जा, पण काळजी घ्या !
चिखलदरा पर्यटनस्थळावर नजीकच्या मध्य प्रदेशात सहा राज्यभरातील पर्यटक हजारोंच्या संख्येने येतात. परिवारासह येणाऱ्यांची संख्या अधिक असली तरी युवा वर्गाची हुल्लडबाजी नियमाचे पालन न करणे यातच त्यांना जीव गमवावा लागत असल्याचे वास्तव चित्र आहे. पर्यटनस्थळावर ठिकठिकाणी फलक लावले असले तरी त्याचे पालन करताना पर्यटक दिसत नाहीत.
बॉक्स
पावसाळी पर्यटकांचा धबधब्यांवर रोख
चिखलदरा पर्यटनस्थळावरील जवळपास सर्वच प्रेक्षणीय असलेले पॉईंट वन आणि व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीत आहे. जत्राडोह, चिचाटी, भीमकुंड, कलालकुंड, बकादरी, जवाहर कुंड, सुरई नाला व मध्य प्रदेशच्या धारखोराला पर्यटकांची सर्वाधिक पसंती मिळत आहे.
महिना पर्यटक
जून २०२१ २५,५६०
जुलै ७६,२१३
आगस्ट ९३,३५४
बॉक्स
नियमांचे करा पालन, ही घ्या काळजी
वन आणि व्याघ्र प्रकल्पांतर्गत जंगल सफारी व पर्यटनासाठी पर्यटकांना शिस्तीचे पालन करणे गरजेचे आहे, अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे फलक ठिकठिकाणी लागले आहे. कुठल्याही धबधब्यावर पर्यटकांना जाता येत नाही. तरीसुद्धा पर्यटक हुल्लडबाजी, सेल्फी आणि पोहण्याच्या नादात उतरून जीव गमावत आहेत. पर्यटकांनी जाताना दुरूनच फोटोसेशन करून पर्यटनाच्या आनंद घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष विजया राजेंद्रसिंह सोमवंशी यांनी केले आहे.
बॉक्स
तीन महिन्यात सात पर्यटकांनी गमावला जीव
चिखलदरा पर्यटनस्थळावरील मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत मेळघाट वन्यपरिक्षेत्रातील जत्राडोह या धबधब्यात तीन पर्यटकांनी जीव गमावला, तर अकोट-पोपटखेडा मार्गावर दोघांनी, चिचाटी व कलालकुंड येथे प्रत्येकी एक अशा तिघांनी जीव गमावला. यात कुणालाही पोहता येत नसल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.
कोट
सेल्फी आणि पोहण्याच्या नादात तीन महिन्यातच जवळपास सात पर्यटकांना जीव गमवावा लागला. त्यातील एकालाही पोहता येत नव्हते. पर्यटनाचा आनंद घ्या, पण नियमाचे पालनसुद्धा करणे गरजेचे आहे.
- राहुल वाढवे, ठाणेदार, चिखलदरा
कोट
जून ते आगस्ट या तीन महिन्यात दोन लाखांच्या जवळपास पर्यटकांनी भेटी दिल्या. सुरक्षेच्या दृष्टीने फलक पालिका क्षेत्रात लावण्यात आले आहेत. पर्यटकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
- सुधाकर पानझाडे, मुख्याधिकारी, नगर परिषद, चिखलदरा