चिखलदऱ्यातील थरार, पंचबोल पॉइंट्सच्या दरीत पर्यटक कोसळला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 05:34 PM2019-07-28T17:34:32+5:302019-07-28T17:36:48+5:30
दीडशे फूट दरीत अडकला
चिखलदरा (अमरावती) : मित्रांसोबत फिरायला आलेला वर्धेचा युवक येथील पंचबोल पॉइंटच्या खोल दरीत कोसळला. पर्यटकांच्या काळजात धस्स झाले. मात्र, तो दरीत दीडशे फूट अंतरावरील झाडाला अडकल्याने सुखरुप बचावला. त्याच्या मित्रांनी पोलिसांच्या सहकार्याने त्याला सुखरूप बाहेर काढले. रविवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास हा थरार घडला. आकाश राजू बैलमारे (२३, रा. किनाडा ता.हिंगणघाट जि.वर्धा) असे जखमी युवकाचे नाव आहे.
आकाश बैलमारे, मंगेश पाटील, प्रणय पाटील, रोशन सुरजुशे, शुभम गाडगे, रुपेश बावने, राकेश बोबडे हे मित्र एमएच ०६ एएन ६९७५ क्रमांकाच्या वाहनाने चिखलदरा येथे फिरायला आले होते. चिखलदऱ्यातील विविध पॉइंटला भेटी देत रविवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास ते पंचबोल पॉइंटवर पोहोचले. पैकी आकाश बैलमारे नियमांचे उल्लंघन करून दरीच्या कपारीवर गेला. पाय घसरल्याने खाली कोसळला. तथापि, दीडशे फूट अंतरावर जाऊन झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला. चिखलदºयाचे ठाणेदार आकाश शिंदे, नगरसेवक अरुण तायडे यांनी रोपवेच्या सहाय्याने त्याला बाहेर काढले. डोक्याला किरकोळ इजा झाल्याने त्याच्यावर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. सदर युवक शौचास गेला असता दाट धुक्यात पाय घसरल्याने हा अपघात झाल्याचे त्याच्या मित्रांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात पर्यटकांची हुल्लडबाजी सुरू असल्याने हा अपघात झाल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
अपघाताच्या सतत घटना
चिखलदरा पर्यटन स्थळावर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दाट धुके पसरले असल्यामुळे हजारोच्या संख्येने पर्यटकांनी शनिवार-रविवार या दोन दिवसांत हजेरी लावली. त्यात पर्यटनस्थळावरील नियमांना पायदळी तुडवत पर्यटक हुल्लडबाजी करीत असल्याने असे अपघात सतत घडत आहेत.