भिवापुरात तब्बल १२ तासांनंतर पर्यटकांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:17 AM2021-09-10T04:17:44+5:302021-09-10T04:17:44+5:30
फोटो - दहाट १ते ५ दोन जण पडले बाहेर, चार जणांचा गुरुवारी रेस्क्यू; प्रशासन रात्रभर घटनास्थळी सूरज दाहाट- तिवसा ...
फोटो - दहाट १ते ५
दोन जण पडले बाहेर, चार जणांचा गुरुवारी रेस्क्यू; प्रशासन रात्रभर घटनास्थळी
सूरज दाहाट- तिवसा : तालुक्यातील भिवापूर येथे तलावाच्या मधोमध अडकलेल्या चार पर्यटकांना गुरुवारी सकाळी ६ वाजता रेस्क्यू करून सुखरूप वाचवण्यात आले. तब्बल १२ तास हा थरार अमरावती येथील चौघांनी अनुभवला. अख्खी रात्र पुरात चौघांनी काढली, तर तालुका प्रशासन रात्रभर घटनास्थळी होते.
तालुक्यात बुधवारी दुपारपसून कोसळत असलेल्या पावसामुळे नदी-नाले एकत्र झाले होते. त्यामुळे ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशातच भिवापूर येथील तलावात निसर्गपर्यटनाला आलेले अमरावती येथील सहा पर्यटक अडकले. अचानक मुसळधार पाऊस कोसळल्याने सायंकाळी ६ च्या सुमारास सहाही जण मधोमध पुरात अडकले होते. त्यापैकी दोघांनी मोठ्या हिमतीने येथून आपली सुटका करून घेतली. चार जणांना मात्र निघणे शक्य झाले नाही. तालुका प्रशासनाला माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे रेस्क्यू पथक रात्री १० वाजता घटनास्थळी दाखल झाले. मात्र, रात्र असल्याने तसेच पाण्याला जास्त ओढ असल्याने रात्री मदतकार्य थांबले होते. सकाळी पुन्हा मदत कार्य सुरू करण्यात आले. यात सकाळी ६ वाजता सर्वांना बाहेर काढण्यात आले. दोर व बोट टाकून मोठ्या प्रमाणात शर्थीचे प्रयत्न करीत रेस्क्यू टीमने हे काम केले. यावेळी उपविभागीय महसूल अधिकारी नरेश फुलझेले, तहसीलदार वैभव फरतारे, मंडल अधिकारी नंदू मधापुरे उपस्थित होते.
----------------
नमस्कारी गावाला पुराने वेढले
अप्पर वर्धा धरणाची दारे उघडल्याने नमस्कारी गावाला दोन्ही बाजूला पुराने वेढले. त्यामुळे रात्रीपासून या गावाचा संपर्क तुटला. कौंडण्यपूर येथील पुलावरून पाणी गेल्याने अमरावती जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्याकडे जाणारा आर्वी मार्ग बंद झाला आहे.
---------------
दोन कोट येत आहे.