दर्यापूर तहसील कार्यालयातील कोतवाल बडतर्फ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:12 AM2021-03-14T04:12:51+5:302021-03-14T04:12:51+5:30
दर्यापूर : येथील उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांच्या कार्यकाळातील अनियमिततेचे प्रकरण जिल्ह्यात गाजत असताना ...
दर्यापूर : येथील उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांच्या कार्यकाळातील अनियमिततेचे प्रकरण जिल्ह्यात गाजत असताना त्यांच्या शासकीय वाहनावर चालक म्हणून काम करणारे आणि गायवाडी येथील कोतवाल पदावर कार्यरत असलेले चक्रधर रुपराव बेलसरे यांना शासकीय सेवेतून अखेर बडतर्फ करण्यात आले.
बेलसरे हे मौजा गायवाडी येथील कोतवाल असून, ते उपविभागीय अधिकारी यांचे वाहनचालक म्हणून काम पाहत होते. दर्यापूर उपविभागीय कार्यालयातील राजस्व प्रकरणे, तुकडेबंदी कायदा, प्लॉट विभाजन, अकृषक, सिलिंग प्रकरणे यात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याची तक्रार जिल्हाधिकातहसीलदारांचा आदेशकडे करण्यात आली होती. यावरून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निरीक्षण पथकाने उपविभागीय कार्यालयाचे निरीक्षण केले असता, वरील महसूल प्रकरणे चक्रधर बेलसरे यांनी परस्पर तयार करून लिपिकाच्या अनुपस्थितीत वर्गवारीत स्वहस्ताक्षरात नोंदविले असल्याचे स्पष्ट झाले होते. गंभीर बाब म्हणजे सदर प्रकरणांमध्ये काही प्रकरणे वर्गवारीत न नोंदविता परस्पर आदेश दिल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल बुडाला असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार तहसीलदार योगेश देशमुख यांनी चक्रधर बेलसरे यांना कोतवाल सेवेतून बडतर्फ केल्याचा आदेश बजावला आहे. त्यामुळे भविष्यात उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांच्यावर काय कारवाई होईल, याकडे सर्व दर्यापूर- अंजनगाव तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
---------------------