टॉवर्सधारक, बड्या संस्थांचा ‘टॅक्स’ला ‘खो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:01 PM2017-11-12T23:01:34+5:302017-11-12T23:02:06+5:30
महापालिका क्षेत्रातील बड्या संस्था, टॉवर्सधारक, महसूल विभाग आणि शैक्षणिक संस्थांनी तब्बल ४ कोटी रूपये मालमत्ता कर थकविल्याची बाब उघड झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिका क्षेत्रातील बड्या संस्था, टॉवर्सधारक, महसूल विभाग आणि शैक्षणिक संस्थांनी तब्बल ४ कोटी रूपये मालमत्ता कर थकविल्याची बाब उघड झाली आहे. कर वसुलीचा घटलेला टक्का पाहता आता हे बडे थकबाकीदार लक्ष्य करण्यात येणार आहेत.
७ लाख अमरावतीकरांचे प्रतिनिधीत्व करणाºया महापालिकेची आर्थिक मदार मालमत्ता करावर आहे. तथापि, मागील काही वर्षांची तुलना केल्यास मागणी आणि वसुलीत २० टक्क्यांची तफावत असते. सुमारे ७० ते ७५ टक्के कर वसुली प्रत्यक्षात होते.
ही टक्केवारी १०० टक्के होण्यासाठी नगरविकासने निर्देश दिले आहेत. संपूर्ण वसुलीसाठी विशेष अभियान राबविण्याचे निर्देश देऊन प्रत्येक प्रभागातील बड्या १०० मालमत्ताधारकांची यादी तयार करून त्यांच्याकडील थकबाकी वसूल करण्याच्या सूचना आहेत. त्या अनुषंगाने थकीत मालमत्ता धारकांच्या याद्यांवर अंतिम हात फिरवणे सुरू आहे. मागील अनेक वर्षांपासून शहरातील बड्या शैक्षणिक संस्था, टॉवर्सधारक आणि महसुली विभाग महापालिकेला जुमानत नसल्याचे चित्र आहे. महापालिकेचे मर्यादित उत्पन्नाचे स्त्रोत पाहता मालमत्ता कर वसुलीशिवाय पर्याय नाही. तथापि बडे थकबाकीधारक कराची रक्कम भरण्यास पुढे येत नसल्याने यंदा त्यांच्यावर कारवाई व दंडाचा बडगा उगारला जाणार आहे. विशेष म्हणजे, शासकीय कार्यालय व वसाहतींकडे मोठी थकबाकी असल्यास जिल्हाधिकाºयांची मदत घेऊन त्यासाठी पत्रव्यवहार करावा व शतप्रतिशत वसुली करावी, त्यावरच अनुदानाची रक्कम अवलंबून असेल, अशी तंबीही नगरविकासने दिली आहे. त्या पार्श्वभूमिवर बड्या थकबाकीदारांची यादी झोनस्तरावर बनविली जात आहे. तूर्तास एकट्या शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेकडे २७ लाख रूपये थकीत आहे. विभागीय कर्मचारी वसाहतीवर ३४.१५ लाख रूपये थकीत आहे. बड्या थकबाकीदारांमध्ये टॉवर्सधारक आणि शैक्षणिक संस्थाचा टक्का अधिक आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची मागणी ४५ कोटी एवढी असून त्यापैकी ३ नोव्हेंबरपर्यंत २७ टक्के वसुली झाली आहे.
हे आहेत बडे थकबाकीधारक
शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था २१.७३ लाख
विमवि संस्था गृहशास्त्र विभाग ५.१२ लाख
बीएसएनएल ६.६१ लाख
जिल्हाधिकारी निवास २.२९ लाख
बी अॅन्ड सी शासकीय वसाहत ६.१७ लाख
विभागीय आयुक्त कर्मचारी वसाहत ३४.१५ लाख
एनएनसी भवन १३.२७ लाख
कलंत्री/जीटीएल टॉवर ७.०७ लाख
छबीलदास लाठीया १४.०१ लाख
एचव्हीपीएम २.७४ लाख
अडाणेश्वर संस्थान १२.५० लाख
किशोर मंत्री ३.१० लाख
विदर्भ आयुर्वेदिक महाविद्यालय २०.३३ लाख
संत कंवरराम शाळा १३ लाख
संजय प्रमोद देशमुख ६.२९ लाख
रिलायंस टॉवर (येते) ७.०७ लाख