कलेक्टरच्या दालनात घुसविला ट्रॅक्टर
By admin | Published: April 12, 2017 12:34 AM2017-04-12T00:34:41+5:302017-04-12T00:34:41+5:30
बारदाना नसल्याचे क्षुल्लक कारण दर्शवून नाफेड व एफसीआय जिल्ह्यातील शासकीय तूर खरेदी बंद करीत आहे.
तूर खरेदीचा मुद्दा पेटला : जिल्हाधिकाऱ्यांनीच करावी खरेदी, शेतकरी आक्रमक
अमरावती : बारदाना नसल्याचे क्षुल्लक कारण दर्शवून नाफेड व एफसीआय जिल्ह्यातील शासकीय तूर खरेदी बंद करीत आहे. त्यामुळे या यंत्रणांवर आता शेतकऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही. आता जिल्हाधिकाऱ्यांनीच तूर खरेदी करावी, यासाठी जि.प.सदस्य प्रकाश साबळे यांच्या नेतृत्वात चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात तुरीचा ट्रॅक्टर घुसवून प्रतिकात्मक तूर खरेदी आंदोलन करण्यात आले व मागण्यांचे निवेदन प्रभारी जिल्हाधिकारी के.पी. परदेशी यांना सोपविण्यात आले.
अखेरच्या दाण्यापर्यंत शेतकऱ्यांची तूर खरेदी करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मात्र जिल्ह्यासह राज्यातील नाफेड व तुरीचे केंद्र बारदाना नसल्याचे कारण दर्शवून बंद करण्यात येत आहेत. शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.
८० हजार क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत
अमरावती : ८० हजार क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत बाजार समितीत पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार खोळंबले आहेत. पीककर्ज, त्यावरील व्याज भरणे बाकी आहे. मुला-मुलींचे विवाह अडले आहेत. त्यामुळे या यंत्रणांवर शेतकऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांनीच तूर खरेदी करावी, अशी मागणी प्रकाश साबळे यांनी केली व जिल्हाधिकारी कार्यालयात ट्रॅक्टर आणून तुरीची मोजणी करून प्रतिकात्मक आंदोलन केले. यावेळी हरिभाऊ मोहोड, अताउल्लाखान, पंकज देशमुख, समीर जवंजाळ, अनिकेत ढेंगळे, अनिल इंगळे, शशीकांत बोंडे, नितीन पवित्रकार, नरेंद्र बारबुद्धे आदी शेतकरी उपस्थित होते.
पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आत ट्रॅक्टर नेऊन घोषणाबाजी करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी भादंविच्या कलम २७९, सहकलम १३५ मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. प्रकाश साबळे, हरिभाऊ मोहोड, प्रवीण मेटकर, अनुल्ला खान व मिलिंद जाधव अशी आरोपींची नावे आहेत. निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवून नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण करणे, परवानगीशिवाय आंदोलन करणे, पोलीस उपायुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने कारवाई करण्यात आली.
ही तर बाजार समितीची जबाबदारी
बारदान्याअभावी एफसीआय अमरावती बाजार समितीमधील तूर खरेदी बंद करीत असेल तर त्यासाठी उपोषण करण्याऐवजी बारदाना उपलब्ध व्हावा म्हणून संचालकांनी प्रयत्न करायला हवे. उपोषणाचा पर्याय शेतकऱ्यांनी निवडावा बाजार संचालकांनी नाही असे, माजी सभापती सुनील वऱ्हाडे यांनी सांगितले. आपल्या कार्यकाळात दिल्ली व हरियाणा येथील एफसीआयच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधून तासाभरात १० हजार बारदाना उपलब्ध केल्याची आठवण वऱ्हाडे यांनी करून दिली.
ईच्छामरणाची परवानगी द्या
शासनाचे धोरण हे शेतकऱ्यांसाठी मरण ठरत आहे. शासकीय खरेदी केंद्र बंद होत आहेत. याकेंद्रांवर तूर चोरी होते, वजन घटते, भाव मात्र तोच मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांना ईच्छामरणाची परवानगी द्या. आम्ही हाती मशाल घेऊन या मस्तवाल यंत्रणेचा व शासनाचा अंत करतो, असे साबळे म्हणाले.
भंडारा येथून मागविला १ लाख बारदाना
आम्ही यासंदर्भात पाठपुरावा करीत आहोत. बारदान्याअभावी केंद्र बंद पडू नये, यासाठी एक लाख बारदाना भंडारा येथून मागविला आहे. एफसीआय येथील बारदाना घेण्यास तयार नाही. शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना बारदाना खरेदीचे अधिकार दिले आहेत. मात्र, आदेश अप्राप्त असल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी के.पी.परदेशी यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले.
सुटीच्या दिवशीही सुरू ठेवावे खरेदी केंद्र
जिल्ह्यात सद्यस्थितीत ८५ हजार पोत्यांची मोजणी व्हायची आहे. लवकरच सर्व ठिकाणी केंद्र सुरू करण्यात येतील. एक लाख बारदाना लवकरच पोहोचत आहे. यातील ३० हजार पोते व्हीसीएमएसद्वारा एफसीआयला भाडेतत्वावर देण्यात येतील, असे प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगताच शनिवार, रविवारसह सुटीच्या दिवशी केंद्र सुरू ठेवण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
तूर खरेदीसाठी बाजार समिती संचालकांचे उपोषण
बारदानाअभावी बंद करण्यात आलेली तूर खरेदी एफसीआयने त्वरीत सुरू करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरावती बाजार समिती उपसभापतीसह संचालकांनी मंगळवारी उपोषण सुरू केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बाजार समितीमधील बंद एफसीआयचे तूर खरेदी केंद्र चार दिवसांत सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही ते सुरू झाले नाही. त्यामुळे बाजार समिती उपसभापती किशोर चांगोले, संचालक प्रफुल्ल राऊत, विकास इंगोले, अशोक दहीकर, नाना नागमोते, उमेश घुरडे, विनोद गुहे, वीरेंद्र जाधव, प्रितम भटकर आदी उपोषणावर आहेत.