काँक्रीटीकरण फोडून हलवला ट्रॅक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:11 AM2021-01-10T04:11:26+5:302021-01-10T04:11:26+5:30
फोटो पी ०९ धारणी ट्रॅक्टर धारणी : रस्ता बांधकामादरम्यान उभा असलेला ट्रॅक्टर न हलविता त्याभोवती करण्यात आलेले क्राँक्रीटीकरण शनिवारी ...
फोटो पी ०९ धारणी ट्रॅक्टर
धारणी : रस्ता बांधकामादरम्यान उभा असलेला ट्रॅक्टर न हलविता त्याभोवती करण्यात आलेले क्राँक्रीटीकरण शनिवारी फोडण्यात आले. पडलेला खड्डा बुजविण्यात आला. मात्र कॉंक्रीटीकरणातून बाहेर काढलेला ट्रॅक्टर पुन्हा दोन फुट अंतर सोडून रस्त्यावरच उभा करण्यात आला. एक ट्रॅक्टरचालक नगरपंचायत प्रशासनाला वाकुल्या दाखवत असताना, यंत्रणेने पाळलेले मौन संतापजनक व आश्चर्यजनक ठरले आहे.
धारणी नगरपंचायतमार्फत गुजरीबाजार परिसरातील रस्ता बांधकामादरम्यान येत असलेला ट्रॅक्टर हटविण्यास मालकाकडून नकार आल्यानंतर ट्रॅक्टरभोवतीच कॉंक्रीटीकरण करण्यात आले. ते झाल्यानंतरच आपण ट्रॅक्टर हटवू, अशी भूमिका मालकाने घेतली. त्यावर कळस म्हणजे ठेकेदाराने कायद्याची पायमल्ली करत तो ट्रॅक्टर कॉंक्रीटीकरणात दाबला. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच शनिवारी ठेकेदाराने मजुरांकडून ते कॉंक्रीटीकरण फोडून ट्रॅक्टर बाजुला केला खरा, मात्र आधीच नगरपंचायत प्रशासनाला आव्हान दिल्याप्रमाणे डॉ. रमिज शेख यांनी आपला ट्रॅक्टर तेथून पुढे दोन फुट अंतरावर भररस्त्यात उभा करून ठेवला. याप्रकरणात नगरपंचायत काय कारवाई करते, याकडे धारणीकरांचे लक्ष लागले आहे.
कोट
ट्रॅक्टर हटविण्यास नकार दिल्यावर कंत्राटदाराने आम्हाकडे लेखी तक्रार करणे गरजेचे होते. तक्रारीअंती कारवाई करून ट्रॅक्टर हटवू शकलो असतो.
मिताली सेठी
सहायक जिल्हाधिकारी तथा
प्रशासक नगरपंचायत