बाजार समितीत प्रशासन विरूद्ध व्यापारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:14 AM2021-03-08T04:14:21+5:302021-03-08T04:14:21+5:30

धारणी : रबी हंगामातील शेतमाल खरेदीप्रकरणी बाजार समिती आणि परवानाधारक व्यापाऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. इतकेच नव्हे ...

Traders against administration in the market committee! | बाजार समितीत प्रशासन विरूद्ध व्यापारी!

बाजार समितीत प्रशासन विरूद्ध व्यापारी!

Next

धारणी : रबी हंगामातील शेतमाल खरेदीप्रकरणी बाजार समिती आणि परवानाधारक व्यापाऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. इतकेच नव्हे तर हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. मात्र, पुढे समेट घडवून आणण्यात आला. सेस भरल्यानंतर प्रकरण आपसात मिटविण्यात आले.

रबी हंगामासाठी बाजार समितीद्वारे जाहीर लिलाव पद्धती सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे खासगी व्यापारी हे आपापल्या दुकानांमध्ये धान्याची खरेदी करीत आहे. मात्र, असे करीत असताना त्यांच्याकडून बाजार समितीला देय असलेली सेसची रक्कम बुडविण्याचा प्रकार सुरू झाल्यामुळे व्यापारी आणि समितीचे अधिकारी एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. शुक्रवारी सायंकाळी असेच एक प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आणि संबंधित व्यापाऱ्याचा ट्रक पोलीस ठाण्यात लावण्यात आला.

सदर ट्रकमध्ये चना भरून मध्य प्रदेशकडे नेत असताना सेस चुकवल्यामुळे कारवाई सुरू झाल्याचे समितीचे म्हणणे होते. दरम्यान व्यापाऱ्यांनी अरेरावी केल्याने संबंधित ट्रक पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. मात्र, तो चना शेतकऱ्यांचा असून व्यवहार फिस्कटल्यामुळे तो चना आपल्या गावी परत घेऊन जात आहे, असा दावा व्यापाऱ्याकडून करण्यात आला. मात्र, संबंधित ट्रक मध्यप्रदेशातील खंडवाकडे जाताना समितीने कारवाई केली. शेवटी दुसऱ्या दिवशी सेस रक्कम भरल्यानंतर सदर ट्रक सोडण्यात आले. मात्र, दुसऱ्या दिवशी त्याचे परिणाम समोर आले. व्यापाऱ्यांनी एकी करून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शेख शरीफ अब्दुल रज्जाक यांना दुकानात बोलावून मारहाण केल्याचा प्रकार शनिवारी दुपारी ४ वाजता घडला. याप्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांसह संचालकाला अटक करून रात्रभर कोठडीत ठेवण्यात आले.

--------

Web Title: Traders against administration in the market committee!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.