वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 10:33 PM2018-12-26T22:33:00+5:302018-12-26T22:33:15+5:30
शहरातील मुख्य मार्गांवरील वाहतूककोंडीने अमरावतीकर हैराण झाले आहेत. सिमेंट रस्त्यांचे बांधकाम डोकेदुखी ठरली आहे. जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका वाहनचालकांनाच बसत आहे. सार्वजनिक बांधकाम व पोलीस विभाग यांच्यातील समन्वयाअभावी दररोज नागरिकांना जीव मुठीत घेऊनच रस्त्यांवरून वाहने न्यावी लागत आहेत.
अमरावती : शहरातील मुख्य मार्गांवरील वाहतूककोंडीने अमरावतीकर हैराण झाले आहेत. सिमेंट रस्त्यांचे बांधकाम डोकेदुखी ठरली आहे. जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका वाहनचालकांनाच बसत आहे. सार्वजनिक बांधकाम व पोलीस विभाग यांच्यातील समन्वयाअभावी दररोज नागरिकांना जीव मुठीत घेऊनच रस्त्यांवरून वाहने न्यावी लागत आहेत.
शहराच्या विकासात्मक कामकाजात अमरावतीकर चांगलेच भरडले जात आहेत. अमरावती शहरात कोट्यवधी खर्चून २२ किलोमीटरच्या सिमेंट रस्त्यांची कामे सद्यस्थितीत शहरात सुरू आहेत. मात्र, या बांधकामामुळे वाहतूककोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे. बडनेरा रोडवरील समर्थ हायस्कूल ते गुलशन प्लाझा, नवाथे ते धन्वंतरी, पंचवटी ते पीडीएमसी, कॉटन मार्केट रोड, कठोरा मार्ग, राजापेठ पोलीस ठाण्यासमोर अशा ठिकाणी सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामांमुळे वाहतुकीची ऐशीतैशी झाल्याचे चित्र आहे. वाहतूककोंडीसह अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. पंचवटी चौकातील रस्त्याच्या कामामुळे नागपूरकडून दाखल होणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागत आहेत. एकतर्फी मार्गावर दुहेरी वाहतूक सुरू असल्यामुळे सर्वच मार्गांवर प्रचंड कोंडी निर्माण होते. पादचाºयांना तर रस्ताच उतरला नसल्याचे चित्र आहे. प्रत्येक मार्गावर कर्कश्श हॉर्नचा आवाज, प्रचंड गोंधळ, वाहनचालकांचे वाद, अपघात अशा स्थितीतून अमरावतीकरांना दररोज जावे लागत आहे.
अपघात वाढले
एकेरी मार्गावर दुहेरी वाहतूक सुरू असल्यामुळे किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढले आहे. एकाच रस्त्यांवरून जाणाऱ्या दोन्ही बाजूची वाहने अनियंत्रित होऊन एकमेकांवर धडकत आहेत.
धूळ अन् प्रदूषण
सिमेंट रस्त्यांच्या कामांमुळे अनेक ठिकाणी खड्डे खोदण्यात येत आहेत. त्यातच रस्त्यासाठी सिमेंटचा वापर होत असल्यामुळे हवेत माती व सिमेंटचे कण उडत आहे. हे धूलिकण श्वसनाच्या आजारास कारणीभूत ठरत आहेत.
रुग्णवाहिकांना गर्दीचा फटका
पंचवटी चौक असो बडनेरा रोड, दोन्ही ठिकाणच्या वाहतूक कोंडीत दररोज रुग्णवाहिका अडकल्याचे चित्र असते. यामुळे रुग्णांचेही जीव धोक्यात आले आहे. अद्याप कोणतीही अप्रिय घटना घडली नाही, हीच समाधानाची बाब आहे.
पर्यायाअभावी राँगसाइड वाहतूक
वाहतूककोंडीमुळे जेथून जागा मिळेल, तेथून वाहन समोर नेण्याचे प्रकार सुरू असतात. पर्याय नसल्यामुळे अनेक जण विरुद्ध दिशेनेही वाहन चालविण्यास बाध्य आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे.