वाहतूक पोलिस रस्त्यावर; १०५१ चालकांना ‘ई-चालान’, पोलिस आयुक्तांनी टोचले होते कान 

By प्रदीप भाकरे | Published: May 12, 2024 06:09 PM2024-05-12T18:09:55+5:302024-05-12T18:10:59+5:30

वाहतुकीच्या शिस्तीसाठी पीआय ऑन रोड

Traffic police on the road 1051 drivers were given e-challan by the Commissioner of Police | वाहतूक पोलिस रस्त्यावर; १०५१ चालकांना ‘ई-चालान’, पोलिस आयुक्तांनी टोचले होते कान 

वाहतूक पोलिस रस्त्यावर; १०५१ चालकांना ‘ई-चालान’, पोलिस आयुक्तांनी टोचले होते कान 

अमरावती : पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी केलेली ‘कानटोचणी’ व घेतलेल्या ‘क्लास’चा परिपाक म्हणून शहर वाहतूक विभागाकडून ७ ते १५ मे या कालावधीत विशेष मोहीम राबविली जात आहे. ७ ते ११ मे दरम्यान शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याकरिता व वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या १०५१ वाहन चालकांविरुद्ध ८.२१ लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

शहरातील वाहतूक व्यवस्थेबाबत पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी ७ मे रोजी वाहतूक विभागाची बैठक घेतली. बैठकीदरम्यान शहरातील अपघाताचे प्रमाण कमी करणे, रस्ते सुरक्षा व उपाययोजना तसेच सुरळीत व सुरक्षित वाहतुकीच्या संबंधाने वाहतूक विभागातील अधिकारी व अंमलदारांना आवश्यक सूचना देऊन शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याकरिता आवश्यक मार्गदर्शन केले होते. त्यानुसार, वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त प्रशांत राजे व पोलिस निरीक्षकद्वय रीता उईके व संजय अढाऊ यांच्या नेतृत्वात वाहनचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. यात ७ ते ११ मेदरम्यान ६९० दुचाकी, १३५ कार, १४८ ऑटो, ४६ ट्रकचालकांना दंड आकारण्यात आला.

अशी झाली कारवाई
विशेष मोहिमेदरम्यान अपघातास कारणीभूत घटक भरधाव वेगाने वाहन चालविणे १३६, ट्रिपल सीट वाहन चालविणे १०४, वाहन चालविताना मोबाइल फोनवर बोलणे २८, विना परवाना (अल्पवयीन) ९, सिग्नल जंप १६, विना सीटबेल्ट ४३, गौण खनिजाची असुरक्षित वाहतूक करणारे ट्रक १४ इत्यादी शीर्षाखाली कारवाई करण्यात आली. मॉडिफाइड सायलेंसर लावलेल्या दोन दुचाकींवर कारवाई करण्यात आली आहे.

रात्री ८ ते १२ पर्यंत नाकाबंदी
वाहतूक विभागाद्वारे दररोज रात्री ८ ते १२ दरम्यान विशेष नाकाबंदी राबविण्यात येत आहे. यादरम्यान ४५ वाहनांवर मोटर वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. यात दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या सात वाहनचालकांविरुद्ध ड्रंक अँड ड्राइव्हची कार्यवाही करण्यात आली. यामध्ये सहा दुचाकीचालक व एका ऑटोरिक्षाचालकाचा समावेश आहे. १५ मेपर्यंत ही विशेष मोहीम राबविली जाणार आहे.

रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने प्राणांकित अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. वाहतूक विभागास आवश्यक सहकार्य करावे. ७ ते १५ मे या कालावधीत सुरक्षित वाहतूक व सुरक्षित अमरावतीसाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. - रीता उईके, पोलिस निरीक्षक

Web Title: Traffic police on the road 1051 drivers were given e-challan by the Commissioner of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.