रस्त्यावर सापडलेली रक्कम वाहतूक पोलिसाने केली ठाण्यात जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 01:15 AM2018-08-19T01:15:22+5:302018-08-19T01:15:52+5:30
पोलिसांबद्दल फारसे चांगले बोलले जात नाही. मात्र, तेसुद्धा सुहृद आहेत, याचे उदाहरण पोलिसांच्या कृतीतून वेळोवेळी येत असते. शुक्रवारी रस्त्यावर सापडलेल्या दोन हजारांच्या दोन नोटा वाहतूक पोलिसाने कोतवाली ठाण्यात जमा करून प्रामाणिकपणाचे उदाहरण दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पोलिसांबद्दल फारसे चांगले बोलले जात नाही. मात्र, तेसुद्धा सुहृद आहेत, याचे उदाहरण पोलिसांच्या कृतीतून वेळोवेळी येत असते. शुक्रवारी रस्त्यावर सापडलेल्या दोन हजारांच्या दोन नोटा वाहतूक पोलिसाने कोतवाली ठाण्यात जमा करून प्रामाणिकपणाचे उदाहरण दिले.
नावातच ईश्वर असणारे वाहतूक शाखा पश्चिम झोनचे पोलीस नाईक ईश्वर राठोड (ब.न.१३५८) हे शुक्रवारी अतिवर्दळीच्या जयस्तंभ चौकात वाहतूक नियंत्रणाचे कर्तव्य बजावीत होते. सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत या वेळेत त्यांना कर्तव्य बजावायचे होते. सायंकाळी ६ वाजता ईश्वर राठोड अस्ताव्यस्त वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करीत होते. त्याचवेळी त्यांना दुचाकीने पुढे गेलेल्या दाम्पत्याचे पैसे खाली पडल्याचे दृष्टीस पडले. त्यांनी तत्काळ या दुचाकीस्वार दाम्पत्याला आवाज दिला. मात्र, कर्कश्श हॉर्न व वाहनांच्या गोंगाटामुळे त्या दाम्पत्याने लक्ष न देता, दुचाकी पुढे कॉटन मार्केटकडील दीपक चौकाकडे निघून गेली.
ईश्वर राठोड हे पैसे पडल्याच्या ठिकाणी गेले असता त्यांना दोन हजारांच्या दोन नोटा दिसल्या. त्यांनी पुन्हा हातवारे करीत दुचाकीवरील दाम्पत्याला जोराजोरात आवाज देण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांचे लक्षच नव्हते. ईश्वर राठोड यांच्या हातात चार हजारांची रोख होती. एखाद्या लोभी व्यक्तीने ती रोख लगेच खिशात घातली असती. मात्र, प्रामाणिक वृत्तीमुळे ते पैसे परत करण्याची भावना ईश्वर राठोड यांच्यातील मनात होती. मात्र, वाहतूक नियंत्रणाचे कार्य सोडून ते पैसे ठाण्यात जमा करण्यासाठी लगेच जाऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी त्या दाम्पत्याची ड्युटी संपेपर्यंत प्रतीक्षा करीत ही रक्कम आपल्याकडेच ठेवली. अखेर रात्रीचे नऊ वाजले. ड्युटी आटोपून त्यांनी लगेच कोतवाली पोलीस ठाणे गाठले.
ठाणेदार दिलीप पाटील यांना भेटून रस्त्यावर चार हजार सापडल्याचे ईश्वर राठोड यांनी सांगितले. यानंतर ती रक्कम ठाण्यात जमा करण्यात आली. ज्या दुचाकीस्वार दाम्पत्याची रक्कम रस्त्यावर पडली, ते दाम्पत्य पोलीस ठाण्यात येईल, त्यावेळी त्यांना पैसे परत मिळावे, ही भावना ठेवून ईश्वर राठोड यांनी ती रोख ठाण्यात जमा केली. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे ठाणेदार पाटील यांनीही कौतुक केले.
पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावत असतात. नागरिकांनी पोलिसांना सौजन्यपूर्ण वागणूक देऊन सहकार्य करायला हवे. जीवनात प्रामाणिकपणाच कामास येते.
- ईश्वर राठोड, पोलीस नाईक, वाहतूक शाखा (पश्चिम)