रस्ता वाहतूक सुरक्षेचे मुलांना शिक्षण द्या
By Admin | Published: January 12, 2016 12:10 AM2016-01-12T00:10:12+5:302016-01-12T00:10:12+5:30
रस्ता सुरक्षा ही पोलीस, समाज, पालक व पाल्यांची जबाबदारी आहे. वाहन वेगाने व घाईत चालविल्यामुळे बहुतांश अपघात होतात.
पालकमंत्री पोटे : रस्ता सुरक्षा सप्ताह व अभियानाचे उद्घाटन
अमरावती : रस्ता सुरक्षा ही पोलीस, समाज, पालक व पाल्यांची जबाबदारी आहे. वाहन वेगाने व घाईत चालविल्यामुळे बहुतांश अपघात होतात. वेग नियंत्रणात ठेऊन वाहन चालविल्यास अपघात कमी होतील. अपघात कमी करण्यासाठी तसेच समाजात जागरुकता आणण्यासाठी शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनींना प्रशिक्षण द्यावे आणि रस्ता सुरक्षेचे प्रात्यक्षिक वर्षभर सुरु ठेवावे, अशा सूचना पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी येथे केल्या.
येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने आयोजित २७ व्या रस्ता सुरक्षा सप्ताह व राज्य रस्ता सुरक्षा अभियानचे उदघाटन ना. पोटे यांच्या हस्ते सोमवारी झाले. यावेळी ते बोलत होते. विशेष अतिथी म्हणून आ. अनिल बोंडे, जिल्हाधिकारी किरण गित्ते, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीपाद वाडेकर, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी मार्तंड नेवास्कर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे उपस्थित होते.
वाहन परवाने देताना कागदपत्रांची काळजीपूर्वक तपासणी व्हावी, तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी करावी, कायद्याच्या चौकटीत राहूनच सर्वांनी कामे करावीत, असेही ना. पोटे म्हणाले. यावेळी रस्ता सुरक्षा संदर्भात दिनदर्शिका, पुस्तिका, पॉम्पलेटचे विमोचन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना आ. बोंडे म्हणाले, उमेदवारांची बौध्दिक व मानसिक स्थिती पाहावी. शालेय विद्यार्थ्यांना जबाबदारी देऊन वर्षभर मोहीम राबवावी.
मागील वर्षी ४ लाख ९० हजार लोक अपघातात जखमी झालेत. त्यापैकी एक लाख २४ हजार लोकांचा मृत्यू झाला. या अपघातातील ५२ टक्के लोक १८ ते २९ वर्षे वयोगटातील होते. एकू ण अपघातात १६ टक्के दोष वाहन चालकांचा आहे. नवीन वाहने खरेदी करण्यापूर्वी ती चालविण्यासंदर्भात संपूर्ण माहिती व तंत्रज्ञान वाहन चालकांना द्यावे, डिलर व विक्रेत्यांचीही रस्ते सुरक्षा सप्ताहात मदत घ्यावी, अशी महत्त्वपूर्ण माहिती जिल्हाधिकारी गित्ते यांनी दिली. मोक्याच्या ठिकाणी जाहिरात फलकांव्दारे रस्ते वाहतूक नियमांची माहिती द्यावी, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी बेदरकारपणे वाहने चालवतात त्यांना समुपदेशन करावे, असे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन ज्योती तोटेवार व आभार प्रदर्शन मार्तंड नेवासकर यांनी केले.