रेल्वेत तुडूंब गर्दी; प्रवाशांची गैरसोय
By Admin | Published: November 11, 2015 12:23 AM2015-11-11T00:23:23+5:302015-11-11T00:23:23+5:30
दिवाळी उत्सवाच्या पार्श्वभूमिवर रेल्वे गाड्यात तुडंूब भरून जात असल्याचे चित्र आहे.
प्रवाशांची वाताहत : दिवाळी सणात प्रवाशांना घर गाठणे कठीण
अमरावती : दिवाळी उत्सवाच्या पार्श्वभूमिवर रेल्वे गाड्यात तुडंूब भरून जात असल्याचे चित्र आहे. आरक्षण मिळत नसल्याने प्रवाशांना कसाबसा प्रवास करावा लागत असून प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे वास्तव पुढे आले आहे.
नोकरी, व्यवसाय, रोजगाराच्या शोधात असलेल्यांना यंदा दिवाळीत घर गाठणे प्रचंड महागले आहे. रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण मिळत नसल्यामुळे खासगी ट्रव्हर्ल्संनी प्रवास करावा लागत आहे. रेल्वेत ‘नो रुम’ असल्याचे बघून खासगी ट्रव्हर्ल्सच्या संचालकांनी पुणे, नाशिक, मुंबई, औरंगाबादचे प्रवास भाडे अव्वाच्या सव्वा केले आहे. दिवाळीत घरी जाणे आवश्यक असल्यामुळे अनेक प्रवाशांना जास्त दराचे तिकीट घेऊन खासगी ट्रॅव्हर्ल्सनी प्रवास करण्याचा प्रसंग ओढावला आहे. यावर्षी दिवाळीत विशेष रेल्वे गाड्या सुरू होतील, अशी शक्यता होती. मात्र, गाड्या सुरू झाल्या नसल्याने प्रवाशांचे नियोजन कोलमोडले आहे. सुमारे ८०० ते एक हजार क्रमांकापर्यंत वेटिंग लिस्टचे तिकीट घेऊन रेल्वेने प्रवास करताना प्रवासी दिसून येत आहेत. पुणे, हावडा, मुंबई, नागपूर या मार्गे ये-जा करणाऱ्या विशेष गाड्या सुरु होतील, अशी अपेक्षा प्रवाशांना होती. मात्र, रेल्वे गाड्या सुरु झाल्याच नाही. परिणामी रेल्वे गाड्यात प्रवाशांची तुडूंब गर्दी दिसून येत आहे.
रेल्वे गाड्यांत पाय ठेवायलाही जागा नाही. तरीदेखील प्रवाशांनी रेल्वेने प्रवास करण्याला पसंती दिली आहे. अमरावती- मुंबई, मुंबई- गोंदिया विदर्भ एक्सप्रेस, हावडा-मुंबई ेमेल, हावडा- मुंबई गितांजली, हावडा- पुणे एक्सप्रेस आदी लांबपल्ल्याचा गाड्यांमध्ये प्रचंड गर्दीचे चित्र आहे. दिवाळीत कसेतरी घर गाठले. परंतु परतीचा प्रवास कसा करावा, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. रेल्वेत आरक्षण नाही, तर खासगी ट्रॅव्हर्ल्सची लूट अशा दुहेरी संकटात प्रवासी सापडला आहे.