विदर्भातील निवडणूक अधिकाऱ्यांचा प्रबोधनीत क्लास
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 06:03 PM2019-02-07T18:03:25+5:302019-02-07T18:12:56+5:30
निवडणुकीतील सुधारणा व उद्भवणारे तांत्रिक पेच यासंदर्भात विदर्भाच्या आठ जिल्ह्यांतील उपजिल्हाधिकारी दर्जाच्या ४५ अधिकाऱ्यांना येथील डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ अॅडमिनिस्ट्रेटीव्ह अॅन्ड डेव्हलोपमेंट ट्रेनिंग सेंटरमध्ये ४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान प्रशिक्षण दिले गेले.
अमरावती - आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची जोरदार तयारी सुरू आहे. निवडणुकीतील सुधारणा व उद्भवणारे तांत्रिक पेच यासंदर्भात विदर्भाच्या आठ जिल्ह्यांतील उपजिल्हाधिकारी दर्जाच्या ४५ अधिकाऱ्यांना येथील डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ अॅडमिनिस्ट्रेटीव्ह अॅन्ड डेव्हलपमेंट ट्रेनिंग सेंटरमध्ये ४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान प्रशिक्षण दिले गेले.
प्रशिक्षणात उमेदवारांना पहिल्या दिवशी उमेदवार पात्र व अपात्र, पोष्टल बॅलेट आणि इटीपीबीएस, आयटी अॅप्लिकेशन सुविधा, सुगम, समाधान, सी-व्हिगील, दुसऱ्या दिवशी मॉडेल कोड ऑफ कंडक्ट, एक्सपेंडीचर मॉनिटरींग, नॉमिनेशन बाय कँडीडेट, स्क्युटिनी बाय नॉमिनेशन, तिसऱ्या दिवशी डीइएमपी अॅन्ड कॉन्सिट्युएन्सी प्लॅन, व्हूलनेराबिलिटी मॅपिंग, विड्रॉल ऑफ कँडीडेट, अलॉटमेंट ऑफ सिंबॉल, काऊंटींग, डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट, इव्हीएम, व्हीव्हीपॅट, पोल डे अरेंजमेंट आदी विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले.
अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली येथील उपजिल्हा निवडणूक अधिकारी तसेच अमरावती जिल्ह्यातील बडनेरा, दर्यापूर, धारणी, तिवसा, अचलपूर, चांदूर रेल्वे व मोर्शी या विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा समावेश होता. अकोला जिल्ह्यातील अकोला पूर्व, मूर्तिजापूर, अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, दारव्हा, पुसद, उमरखेड, वणी, राळेगाव व आर्णी, वर्धा जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट व आर्वी, गोंदिया जिल्ह्यातील गॅमदिया, देवरी, तिरोडा व अर्जुनी मोरगाव, भंडारा जिल्ह्यातील भंडारा व तुमसर, गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, अहेरी, देसाईगंज या विधानसभा मतदारसंघातील सहायक निवडणूक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. औरंगाबाद येथील उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत शेळके हे येथे प्रशिक्षक होते. दरम्यान सहाय्यक निवडणूक अधिकारी हे उपविभागीय अधिकारी असल्याने या चार दिवसांच्या अवधीसाठी त्यांचा पदभार संबंधित तहसीलदारांना देण्यात आलेला आहे.
औरंगाबाद व पुणे येथेही चार दिवसांचे प्रशिक्षण
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये ४ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत ६४ अधिकाऱ्यांना दोन बॅचेसमध्ये प्रशिक्षण दिले गेले. ११ ते १४ या कालावधीत वॉटर अॅन्ड मॅनेजमेंट इन्स्टीट्यूट, औरंगाबाद येथे १०१ अधिकाऱ्यांना तीन बॅचेसमध्ये, तर पुणे येथील बीएसएनएल रिजनल ट्रेनिंग सेंटरमध्ये १८ ते २१ फेब्रुवारी दरम्यान १३७ अधिकाऱ्यांना तीन बॅचेसमध्ये निवडणूकविषयक प्रशिक्षण दिले जाणार आहे.