कौशल्य विकासात मातंग समाजाला प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 10:25 PM2018-09-02T22:25:15+5:302018-09-02T22:25:34+5:30
सर्वसामान्यांना न्याय मिळावा, हाच आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. मातंग समाजाच्या उत्थानाकरिता विविध योजना सुरू करून प्रत्येक कुटुंबाला १० बकऱ्या मोफत देऊ. मुस्लिम समाजाकरिता वरूड येथे एक कोटीतून शादीखाना, मुला-मुलींचे वसतिगृह, तालुक्यातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तिघांना पुरस्कार तसेच कौशल्य विकासमध्ये बँडवादक आणि चर्मकाराकरिता प्रशिक्षण आदी घोषणा सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरुड : सर्वसामान्यांना न्याय मिळावा, हाच आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. मातंग समाजाच्या उत्थानाकरिता विविध योजना सुरू करून प्रत्येक कुटुंबाला १० बकऱ्या मोफत देऊ. मुस्लिम समाजाकरिता वरूड येथे एक कोटीतून शादीखाना, मुला-मुलींचे वसतिगृह, तालुक्यातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तिघांना पुरस्कार तसेच कौशल्य विकासमध्ये बँडवादक आणि चर्मकाराकरिता प्रशिक्षण आदी घोषणा सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केल्या. स्थानिक राजुरानाका परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहाचे लोकार्पण शनिवारी त्यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मंत्र्यांच्या हस्ते दिव्यांगांना स्वयंचलित वाहने वितरित करण्यात आल्यात.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. अनिल बोंडे होते. त्रिवेणी सूतगिरणीच्या अध्यक्ष वसुधा बोंडे, नगराध्यक्ष स्वाती आंडे, उपाध्यक्ष हरीश कानुगो, माजी नगराध्यक्ष रवींद्र थोरात, शेंदूरजनाघाटचे नगराध्यक्ष रूपेश मांडवे, बांधकाम सभापती शुभांगी खासबागे, नगरसेविका हर्षदा रक्षे, शालिनी चोबितकर, माया वानखडे, पं.स. सदस्य अंजली तुमडाम, भाजप सरचिटणीस रविराज देशमुख, बाळासाहेब खंडारकर, राम जोशी, तालुकाध्यक्ष देवेंद्र बोडखे, समाजकल्याण आयुक्त चेतन जाधव, सहायक समाजकल्याण आयुक्त मंगला मून, गटविकास अधिकारी सुभाष बोपटे, तहसीलदार आशिष बिजवल, मुख्याधिकारी रवींद्र पाटील, जगदीश वानखडे, गजू ढोके आदी व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी सात दिव्यांगांना जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राच्यावतीने स्वयंचलित वाहनाचे ना. कांबळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कंत्राटदार गोपाल चिमोटे यांचा ना. कांबळे हस्ते सत्कार करण्यात आला.
आ. अनिल बोंडे यांनी संजय गांधी निराधार योजनेतील २५ वर्षे वयाची अट शिथिल करावी, श्रावणबाळ योजनेची अट ६० वर्षे करावी तसेच अनुसूचित जातीकरिता स्वतंत्र वस्तीगृह, हिंदू दलित समाजाला तीन टक्के आरक्षण, मुस्लिम समाजाकरिता शादीखाना मंजूर करण्याची मागणी केली.
नगराध्यक्ष स्वाती आंडे आणि माजी नगराध्यक्ष रवींद्र थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन राजकुमार राऊत व आभार प्रदर्शन शुभांगी खासबागे यांनी केले. कार्यक्रमाला नगर परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.