धडपड वृक्षांसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 01:04 AM2019-04-28T01:04:04+5:302019-04-28T01:08:30+5:30

पाण्याने भरलेल्या कॅन. कुणीही यावे आणि उचलून रोपांच्या आळ्यात पाणी घालावे. त्या पुन्हा पुन्हा भरले जाणे नि पुन्हा पुन्हा रिते होणे. सारे केवळ झाडांसाठी. भानखेडा मार्गावरील चार किमी रस्त्याच्या दुतर्फा रोपे याच तऱ्हेने जगविली जात आहेत.

For trampling trees | धडपड वृक्षांसाठी

धडपड वृक्षांसाठी

googlenewsNext
ठळक मुद्देभानखेडा मार्गावर रोपांना पाणी। निसर्ग समृद्ध करण्यासाठी धडपडताहेत आबालवृद्ध

धीरेंद्र चाकोलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पाण्याने भरलेल्या कॅन. कुणीही यावे आणि उचलून रोपांच्या आळ्यात पाणी घालावे. त्या पुन्हा पुन्हा भरले जाणे नि पुन्हा पुन्हा रिते होणे. सारे केवळ झाडांसाठी. भानखेडा मार्गावरील चार किमी रस्त्याच्या दुतर्फा रोपे याच तऱ्हेने जगविली जात आहेत. या उपक्रमाला पहाटे रपेट करणाऱ्या सुमारे अडीचशे जणांनी वाहून घेतले आहे.
निसर्गाच्या सान्निध्यात रमणाऱ्या या पर्यावरणप्रेमी गटाने आपली ओळख निर्माण करणारी संस्था वा गट स्थापन केलेला नाही. चार-पाच जणांनी सुरू केलेल्या या उपक्रमात आतापर्यंत अडीचशेवर नागरिक जुळले आहेत. त्यांचा दिवस सुरू होतो सकाळी साडेचारपासून. भानखेडा मार्गाने येताना लागणाऱ्या नवीन बायपासपुढे ते वाहने सोडतात. त्यानंतर दोन किमी अंतरावरील सप्तऋषी कष्टभंजन हनुमान मंदिरानजीक हापशीजवळ येतात. येथेच हजरत सैयद इमाम कादरी यांचा दर्गा व टेकडीवर एक मंदिर आहे. या हापशीवर व त्यापुढील टाक्यातून तेलाच्या पाच लिटरच्या निकामी कॅन पाण्याने भरल्या जातात. वनविभागाच्या रोपवाटिकेपासून तर थेट घाट संपेपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा रोपे व पक्ष्यांची घरटी लावली आहेत. त्यामध्ये कॅनमधील पाणी रिचवले जाते. विशेष म्हणजे, या रस्त्याने फिरायला जाणारे मध्यमवयीन ते अगदी नवतरुण अमरावतीकर स्वयंस्फूर्तीने कॅन उचलून रोपांना पाणी देतात आणि कॅन परत आणतात. याशिवाय टेकडीपर्यंत लावलेल्या झाडांनाही पाणी दिले जाते. काही ठिकाणी प्लास्टिक बॉटल उलट्या लटकविल्या गेल्या आहेत. त्यातही पाणी टाकले जाते. सकाळी ८ ते ८.३० पर्यंत हा उपक्रम नित्यनेमाने राबविला जात आहे.
तीन महिन्यांपूर्वी चंचल गुल्हाने, पेरू कोल्हे, लक्ष्मण खाडे यांच्यासह काही सेवानिवृत्तांनी सुरू केलेल्या या उपक्रमाला युवा वर्गाने भरघोस प्रतिसाद दिला. काही जण घरूनच बॉटल भरून आणतात. सामूहिक योगदानातून हा संपूर्ण परिसर हिरवागार करण्याचा मानस सर्वांनी व्यक्त केला आहे.

पक्ष्यांची सोय केवळ झाडे मोठी करणेच उद्दिष्ट नाही, तर या राखीव नवक्षेत्रातील पक्षिविश्व कायम राखण्यासाठी झाडांना मातीचे पसरट भांडे लावण्यात आले आहेत. त्यामध्ये सकाळी रपेट करणारे आवर्जून पाणी टाकतात. काही सुहृद पक्ष्यांना भरवण्यासाठी खाद्यदेखील आणतात.
यांचा सहभाग माधव कुलकर्णी, विजय देवळे, अशोक उभाड, दिगंबर पोफळी, मनोज बांबल, प्रसाद बडगे, रवींद्र बनसोड, नीळकंठराव गजभिये, नरेंद्र रामटेके, श्रीकृष्ण बोंद्रे, सचिन पिकलमुंडे, परीक्षित ढेकेकर, दिलीप खटे, गजानन धर्माळे, दिनेश बाजड, नामदेव मेटांगे, प्रवीण पंचाक्षरी, मनीष काळे, उदय जलतारे, सूरज शेळके, निनाद शर्मा आदी या उपक्रमासाठी परिश्रम घेत आहेत.

Web Title: For trampling trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी