भातकुली तहसीलचे स्थानांतरण नकोच
By Admin | Published: June 20, 2017 12:01 AM2017-06-20T00:01:36+5:302017-06-20T00:01:36+5:30
शहरातील भातकुली तहसीलचे कार्यालय भातकुली गावात स्थानांतरित करण्याचे आदेश महसूल व वनविभागाच्या अवर सचिवांनी १५ जून रोजी दिल्यानंतर ...
काँग्रेस-सेना-भाजपसह सर्व पक्षांची एकी : युवा स्वाभिमान ठाम
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील भातकुली तहसीलचे कार्यालय भातकुली गावात स्थानांतरित करण्याचे आदेश महसूल व वनविभागाच्या अवर सचिवांनी १५ जून रोजी दिल्यानंतर तहसील कार्यालयाच्या स्थानांतरणाचा मुद्दा अधिकच उग्र झाला आहे. भातकुली तहसील कार्यालय अमरावती शहरातच रहावे, यासाठी भाजप, सेना व काँग्रेस या तीन पक्षांसह इतरही पक्ष एकवटले आहेत.
सोमवारी भातकुली तहसीलच्या स्थानांतरणाच्या समर्थनार्थ लढणाऱ्या युवा स्वाभिमान संघटनेसह अन्य सर्व पक्षाच्यावतीने आपापल्या मुद्यांच्या समर्थनार्थ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
भातकुली तहसील कार्यालय सद्यस्थितीत अमरावती शहरात कार्यरत आहे. हे कार्यालय भातकुली तालुक्यातील गावांच्यादृष्टीने सोयीचे असल्याने ते भातकुली गावात हलवू नये, अशी मागणी काँग्रेस, भाजप, सेनेसह इतर सर्वच पक्षांनी केली आहे.
म्हणून बारगळले होते स्थानांतरण
अमरावती : याच मागणीसाठी सोमवारी तिवसा येथील काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, निवेदिता चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय बंड आदींच्या नेतृत्वात शेकडो लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. अमरावती शहराच्या अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर तालुक्याचे संपूर्ण क्षेत्र आहे. त्यामुळे ८० टक्के जनतेला हे कार्यालय अमरावती येथेच असावे, असे वाटते. भातकुली तालुक्याची बाजार समिती, विविध शासकीय कार्यालये अमरावती शहरात आहेत. पर्यायाने तहसील कार्यालयातील कामांसह इतरही कामे सोयीने करता येतात. विद्यार्थ्यांच्या दृष्टीनेसुद्धा हे कार्यालय अमरावती येथेच असणे गरजेचे आहे. त्यामुळे भातकुली तहसील कार्यालयाचे स्थानांतरण होऊ नये, अशी मागणी निवेदनातून काँग्रेस, भाजप, सेनेसह अन्य पक्षांनी केली.
या मुद्याला अनुसरून नागरिकांच्या व सर्वपक्षीय नेत्यांच्या भावना लक्षात घेता योग्य तो पाठपुरावा करण्याचे लेखी व मौखिक आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यानंतरही या मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी काँग्रेसच्या आ.यशोमती ठाकूर, दिनेश सूर्यवंशी, शिवसेनेचे संजय बंड, भाजपच्या निवेदिता चौधरी, जयंत देशमुख, शाम देशमुख, उमेश घुरडे, अमोल निस्ताने, विनोद गुडधे, सोपान गुडधे, काशीनाथ कुयटे, विकास इंगोले, रामदास रहाटे, शेखर अवघड, नरेंद्र मकेश्र्वर, मुकद्दर खाँ पठाण, संजय कोलटेके, संजय पिंगळे, अमरदीप तेलखडे, सुनील जुनघरे, अरविंद अकोलक र यांच्यासह शेकडो नागरिक तसेच काँग्रेस, भाजप, शिवसेना, बहूजन समाज पार्टी,आम आदमी पक्ष व अन्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. सन २००९ मध्ये शासनाद्वारे तहसील कार्यालयाच्या स्थानांतरणाबाबत अधिसूचना निघाली होती. त्यावेळी भातकुली तालुक्यातील ४८ पैकी २६ ग्रापंनी आक्षेप नोंदविला होता तर केवळ पाच ग्रामपंचायती तटस्थ होत्या. सद्यस्थितीत तटस्थ ग्रामपंचायती सुद्धा अमरावती येथेच तहसील कार्यालय ठेवण्याबाबत अनुकूल असल्याने या कार्यालयाचे स्थानांतरण थांबविले होते, हा मुद्दा विरोधकांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडला.
स्थानांतरणाला पूर्वग्रहदूषित
विरोध : युवा स्वाभिमान
शासनादेशाप्रमाणे भातकुली तहसील कार्यालय तातडीने भातकुली गावात स्थानांतरित करण्यात यावे, अशी मागणी सोमवारी युवा स्वाभिमान पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. भातकुलीचा आता सर्वांगीण विकास होत आहे. मात्र, या गावात तहसील मुख्यालय नसल्याने गावातील तसेच आसपासच्या गावातील नागरिकांना अमरावतीला हेलपाटे घालावे लागतात. यात त्यांना प्रचंड मन:स्ताप होतो. म्हणून हे कार्यालय भातकुलीत स्थानांतरित करावे, ही मागणी पुढे आली. यासाठी विविध आंदोलनेही झालीत. आता तर शासनाने सुद्धा तहसीलच्या स्थानांतरणाचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रशासनाने जनभावनांचा आदर करून तहसील कार्यालय भातकुलीत स्थानांतरित करावे, अशी मागणी युवा स्वाभिमानने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. भातकुलीत तहसिल कार्यालय आल्यास टाकखेड संभू, साऊर येथील नागरिकांना भातकुली ते चेचरवाडी हा मार्ग सोईचा आहे. त्यामुळे कोणासाठीच हे स्थानांतरण गैरसोयीचे ठरणार नाही, असा दावा युवा स्वाभिमानने यावेळी केला. स्थानांतरणाला केवळ राजकीय मंडळींचा विरोध असून तो निरर्थक असल्याचे स्वाभिमानचे म्हणणे आहे. यानंतरही तहसील कार्यालय स्थानांतरित न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवा स्वाभिमान संघटनेचे ब्रदीनाथ भोपसे, शंकर डोंगरे, भीमराव कुटेमाटे, शालिनी भोपसे, पंकज रामेकर, आशिष कावरे, संजय हिंगासपुरे, नरेंद्र तेलखडे, अ.शहीद अ.रशीद, सतीश मंत्री, राजू हरणे, दिवाकर हरणे, विनोद जायवाल, महानंदा पवार, मयुरी कावरे, गोकुल उपाध्याय, भगवान देव्हारे, संतोष शिंदे, आदींनी दिला आहे.