उच्च शिक्षण सहसंचालक कळंबे यांची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 07:22 PM2019-03-06T19:22:44+5:302019-03-06T19:22:57+5:30
येथील उच्च शिक्षण सहसंचालक अशोक कळंबे यांची शासनाने बुधवारी तडकाफडकी बदली केली आहे. कळंबे आता गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून मूळ पदावर रूजू होतील, असे आदेश आहेत.
अमरावती : येथील उच्च शिक्षण सहसंचालक अशोक कळंबे यांची शासनाने बुधवारी तडकाफडकी बदली केली आहे. कळंबे आता गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून मूळ पदावर रूजू होतील, असे आदेश आहेत. अमरावतीचे नवे उच्च शिक्षण सहसंचालकपदी मुंबई येथील एलफिस्टन महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक असलेले संजय जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अशोक कळंबे यांच्या कारभाराविरोधात प्राचार्य, शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी होती. २ मार्च रोजी झालेल्या सहविचारी सभेत महाविद्यालयीन शिक्षकांनी त्यांच्यावर ताशेरे ओढले. सन २०१५ पासून उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातून कर्मचा-यांच्या सेवापुस्तिका गहाळ झाल्याबाबत कळंबे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांचे प्रश्न, समस्या सोडविण्यात कळंबे हे अपयशी ठरल्याचा ठपकादेखील ठेवण्यात आला. सहविचारी सभेत अशोक कळंबे विरूद्ध प्राचार्य असा शाब्दिक वाद झाला. हा वाद शमत नाही तोच ४ मार्च रोजी प्राचार्य आर.डी. सिकची यांनी उच्च शिक्षण सहसंचालक अशोक कळंबे यांच्याविरुद्ध गाडगेनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार नोंदविली.
कळंबे यांनी १० महिन्यांपासून घरभाडे भत्त्याची उचल करीत असल्याचे म्हटले होते. ते शासकीय विश्रामभवनात राहत असताना घरभाडे भत्त्याची उचल करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध फौजदारी दाखल करावे, अशी तक्रार पोलिसांत करण्यात आली होती. परिणामी ही गंभीर बाब शासनाच्या निदर्शनास येताच बुधवार, ६ मार्च रोजी उच्च शिक्षण विभागाचे कार्यासन अधिकारी म.प्र. किणी यांच्या स्वाक्षरीने कळंबे यांची गडचिरोली येथे बदली आदेश निर्गमित करण्यात आले आहे.
उच्च शिक्षण सहसंचालक अशोक कळंबे यांच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आल्यामुळे शासनाला त्यांची बदली करावी लागली. गत १० महिन्यांपासून ते अनेक विषयांवर वादग्रस्त ठरले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांचे प्रश्न, समस्या सोडवू शकले नाहीत. घरभाडे भत्ता उचलप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल.
- आर.डी. सिकची,
अध्यक्ष, प्राचार्य फोरम, अमरावती विद्यापीठ