राज्यात आठ आयएफएस अधिका-यांच्या बदल्या; सुनील लिमये, दिलीप सिंग यांना बढती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 05:04 PM2017-11-15T17:04:39+5:302017-11-15T17:05:04+5:30
भारतीय वनसेवेतील आठ वरिष्ठ वनाधिका-यांचे बदली आदेश महूसल व वने विभागाने काढले आहे. यात ठाणे येथील प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये आणि नागपूर येथील अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक दिलीप सिंग यांना बढती मिळाली आहे.
- गणेश वासनिक
अमरावती : भारतीय वनसेवेतील आठ वरिष्ठ वनाधिका-यांचे बदली आदेश महूसल व वने विभागाने काढले आहे. यात ठाणे येथील प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये आणि नागपूर येथील अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक दिलीप सिंग यांना बढती मिळाली आहे.
राज्याच्या महसूल व वने विभागाने बुधवारी १५ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या शासन आदेशानुसार आठ आयएफएस अधिकाºयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नागपूर येथील अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन दुय्यम संवर्ग) दिलीप सिंग यांची नागपूर येथील महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या सदस्य सचिवपदी नियुक्तीने बढती दिली आहे. ठाणे येथे प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांची नागपूर येथे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) पदी बढती देण्यात आली आहे. धुळे येथे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) आर. एस. कदम यांची ठाणे येथील मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), पुणे येथील मुख्य वनसंरक्षक (संशोधन) टी.एन. साळुंखे यांची धुळे येथील मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), पनवेल येथील उपवनसंरक्षक (भूमी अभिलेख) एन.बी. गुदगे हे औरंगाबाद येथे सामाजिक वनीकरणात वनसंरक्षकपदी, धुळे येथील उपवनसंरक्षक नीनू सोमराज यांची पेंच व्याघ्र प्रकल्पात उपसंचालकपदी, दीर्घकालीन रजेवर असलेले राकेश सेपट यांची रायगड जिल्ह्यातील रोहा येथे उपवनसंरक्षक (प्रादेशिक) तर रोहा येथील उपवनसंरक्षक (प्रादेशिक) विजय सुर्यवंशी यांची नाशिक येथे सामाजिक वनीकरणाच्या उपवनसंरक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
नवख्या आयएफएसची बदलीसाठी अशीही फिल्डिंग
राज्याच्या वनविभागात आठ आयएफएस अधिका-यांच्या बदल्या, बढती प्रक्रिया पार पडली असली तरी सन २०१४ चे आयएफएस अधिकारी राकेश सेपट यांच्या बदलीबाबत चर्चा रंगू लागली आहे. सेपट यांचे आयएफएसचे प्रशिक्षण पूर्ण होताच पहिली पोस्टींग ही पूर्व मेळघाटात देण्यात आली होती. पहिल्या पोस्टींगवर नियुक्त होणे क्रमप्राप्त असताना राकेश सेपट हे रूजू न होता दीर्घ रजेवर गेले. त्यानंतर बराच काळ ते मलईदार पदाच्या प्रतीक्षेत होते. अखेर मलईदार खुर्ची खाली होताच सेपट यांनी बदली करुन घेतली. मात्र, पूर्व मेळघाटात रूजू न झाल्याबद्दल सेपट यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे सौजन्य सुद्धा वनखात्याने दाखविले नाही. सेपट यांना बदलीसाठी वनमंत्रालयातून भरीव सहकार्य देखील मिळाले आहे.