आरएफओंच्या बदल्यांमध्ये ‘कही खुशी, कही गम’; पण मलईदार जागा रिक्तच
By गणेश वासनिक | Published: August 31, 2024 06:34 PM2024-08-31T18:34:55+5:302024-08-31T18:55:19+5:30
राज्यात पहिल्यांदाच वनवृत्तनिहाय बदल्यांची यादी जाहीर : ‘विनंती’ बदल्यांमध्ये गेम होण्याचे संकेत
गणेश वासनिक
अमरावती : राज्याच्या महसूल व वनविभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच ११९ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी शुक्रवारी वनवृत्तनिहाय जाहीर केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत वनविभाग आरएफओंच्या बदल्यांची यादी राज्यस्तरावर जाहीर करीत होते. मात्र, शासनाने यंदा बदल्यांची यादी सर्कलनिहाय प्रसिद्ध करून नेमके काय साध्य केले, हे कुणालाही कळू शकले नाही; परंतु यात काहींनी ‘अर्थ’पूर्ण व्यवहार केले; पण त्या ठिकाणी पोस्टिंग मिळाली नाही. त्यामुळे आरएफओंमध्ये ‘कही खुशी, कही गम’ असे चित्र दिसून येत आहे.
वनवृत्तनिहाय रिक्त असलेल्या मलईदार जागा
■ कोल्हापूर वनविभाग : मलकापूर, वाई (सातारा वनविभाग), जत (सांगली), कणकवली, आंबोली व सावंतवाडी.
■ छत्रपती संभाजीनगर : खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर, तुळजापूर, भूम, लातूर विशेष कार्य.
■ गडचिरोली वनवृत्त : वडसा, कुरखेडा, आरमोरी, अहेरी, मार्कंडा कनसोबा.
■ ठाणे वनवृत्त : येवूर वन्यजीव, पनवेल, बदलापूर रिक्त.
■ नाशिक वनवृत्त : भंडारदरा वन्यजीव, हरिश्चंद्र वन्यजीव.
■ पुणे वनवृत्त : भांबुर्डा, वडगाव मावळ, पौंड, खेड राजगुरूनगर, मनचर ओतूर, सासवड, नरसापूर.
आरएफओंच्या ‘विनंती’ बदल्यांमध्ये ‘फिक्सिंग’
वनविभागात शुक्रवारी आरएफओंच्या प्रशासकीय बदल्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. आता खऱ्या अर्थाने आरएफओंच्या ‘विनंती’ बदल्यांमध्ये मोठे ‘अर्थ’पूर्ण राजकारण होण्याचे संकेत आहेत. त्यामुळेच राज्यात अनेक ठिकाणी ‘विनंती’च्या आरएफओंनी मलईदार जागा राखून ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, अमरावती, यवतमाळ वनवृत्त या बाबीला अपवाद ठरले आहे. मेळघाटमधील बदलीपात्र आरएफओंवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली आहे.