आता बदल्या होणार आॅनलाईन! सामान्य प्रशासन विभागाचे धोरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 05:11 PM2018-02-15T17:11:15+5:302018-02-15T17:11:29+5:30
अमरावती - ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या बदलीसाठी राबविलेल्या प्रक्रियेच्या धर्तीवर शासकीय अधिकारी आणि कर्मचाºयांच्या बदलीसाठी येत्या एप्रिल, मे मध्ये आॅनलाईन प्रक्रिया राबविली जाणार आहे.
बदलीसाठी १० जागांचा पसंतीक्रम द्यावा लागणार असून, त्यापैकी कोणत्याही एका ठिकाणी बदली झाल्यास तेथे रुजू व्हावे लागणार आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी व परिसरात वर्षानुवर्षे राहणा-या तसेच राजकीय हस्तक्षेपाने मोक्याच्या ठिकाणी बसणा-या अधिका-यांना आता बसणार आहे. शिक्षकांनी आपल्या पसंतीच्या १० जागा दिल्यानंतर त्यांच्या समुपदेशाने या जागांसाठी प्रक्रिया राबविण्यात आली. बदलीच्या या धोरणाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले असून याच धर्तीवर विविध विभागांनाही हे धोरण लागू करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत. त्यानुसार येत्या एप्रिल, मे महिन्यात नव्या धोरणानुसार भरती प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या सूत्रांनी दिली.
या बदली प्रक्रियेत बदलीस पात्र अधिकारी व कर्मचा-यांची यादी तसेच रिक्त होणाºया जागांची यादी जाहीर केली जाईल. संबंधितांना आपल्याला हव्या असलेल्या बदलीच्या ठिकाणांचा प्राधान्यक्रम द्यावा. त्यानंतर त्याने यापूर्वी कोठे काम केले त्याची गुणवत्ता, आवड आणि उपयोगिता तपासून बदली करण्यात येईल. त्यामुळे बदलीच्या धोरणात सुसूत्रता येणार आहे. या नव्या धोरणामुळे एकाच ठिकाणी ठाण मांडून असलेल्या प्रकारांना आळा बसणार असून, सर्व अधिकाºयांना समान संधी मिळणार आहे.