विकास आराखड्यातून रिद्धपूरचा कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 09:56 PM2018-12-25T21:56:43+5:302018-12-25T21:57:04+5:30
महानुभावपंथीयांची काशी श्रीक्षेत्र रिद्धपूर येथील विकासकामांसाठी ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास अंंतर्गत २१५ कोटी रुपयांचा आराखडा आ. अनिल बोंडे यांनी प्रस्तावित केला आहे. देशभरातून येणारे महंत व भाविकांना या ठिकाणी शेगावच्या धर्तीवर सुविधा उपलब्ध होणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : महानुभावपंथीयांची काशी श्रीक्षेत्र रिद्धपूर येथील विकासकामांसाठी ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास अंंतर्गत २१५ कोटी रुपयांचा आराखडा आ. अनिल बोंडे यांनी प्रस्तावित केला आहे. देशभरातून येणारे महंत व भाविकांना या ठिकाणी शेगावच्या धर्तीवर सुविधा उपलब्ध होणार आहेत.
रिद्धपूर येथून मराठी भाषेचा उगम झाला. येथेच मराठी भाषेचे विद्यापीठ करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकारात्मक भूमिका असून, त्यांनी ग्रामविकासासाठी २१५ कोटींच्या निधीला तात्त्विक मंजुरी दिली आहे. या निधी अंतर्गत गावातील सर्व काँक्रीट रस्ते, बाजार चौकातील काँक्रीटीकरण, रंगमंच, शौचालये व सौंदर्यीकरणासोबतच बंदिस्त नाली बांधकाम युद्धस्तरावर सुरू करण्यात आले आहे. रिद्धपूर गावात कित्येक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवते. आठ-दहा दिवसआड लोकांना पाणीपुरवठा होतो. या गंभीर समस्येची दखल घेऊन मुख्यमंत्री पेयजल पाणीपुरवठा अंतर्गत १२ कोटी रुपये मंजूर करून विश्रोळी धरणातून पाइप लाइन तसेच गावात पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. मोर्शी-चांदूरबाजार रोडवर रिद्धपूर बसथांब्यापासून गावापर्यंत दुतर्फा दीड किलोमीटर हायमास्ट दिवे लागतील. या ठिकाणी शेगावच्या धर्तीवर उद्यान होणार असून, भाविकांना या निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेता येईल. मंदिरापुढे दुकानांसाठी गाळे बनविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. विकासकामांमुळे रिद्धपूरचे रूपडे पालटणार आहे.