तीन दिवसांत ट्रान्सफार्मर बसवा, अन्यथा खैर नाही
By admin | Published: November 22, 2015 12:06 AM2015-11-22T00:06:27+5:302015-11-22T00:06:27+5:30
प्रत्येक बैठकीत जिल्ह्यात ‘आॅल इज वेल’ अशी स्थिती दर्शविता, वस्तूस्थिती मात्र वेगळीच आहे.
पालकमंत्र्यांचा रूद्रावतार : शेतकरी मरत असताना तुमचा लाड कशाला?
अमरावती : प्रत्येक बैठकीत जिल्ह्यात ‘आॅल इज वेल’ अशी स्थिती दर्शविता, वस्तूस्थिती मात्र वेगळीच आहे. शेतकरी मरत असताना तुमचा लाड कशासाठी, तीन दिवसांत जिल्ह्यात ट्रॉन्सफार्मर बसले नाही तर तुमची खैर नाही. अशा शब्दांत पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महावितरणच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.
शेतकऱ्यांशी व्यवस्थित बोलणे शिका, तुम्हीदेखील शेतकऱ्यांचेच पुत्र आहात, कास्तकारांनी संयम सोडला तर तुमची काय गत करेल अन् मी त्या शेतकऱ्यासोबत राहील तुमची पाठराखण करणार नाही. मात्र तुम्हाला कोणी त्रास देत असतील तर मला सांगा. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, असे ना. पोटे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
तुम्हाला शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी दिसत नाही काय? ज्याला नोकरी करायची नाही त्याने खुशाल निघून जावे, आठ दिवसांत कामे करा अन्यथा नोकऱ्या सोडा, सामूहिक राजीनामे द्या, माझ्यासाठी शेतकरी महत्त्वाचा आहे, शेतकरी जगला पाहिजे. त्यांच्यासाठी पालकमंत्री म्हणून काहीही करावयाची आपली तयारी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अमरावती जिल्हा गाजतो आहे, हा काय तमाशा तुम्ही लावलाय. यापुढे शेतकऱ्याची तक्रार यायला नको, अशी तंबी उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. तीन दिवसांत ट्रान्सफार्मर बसायला पाहिजे. उपलब्ध कुठे आहे सांगा, आपण उचलून लावू. शेती पिकांना पाण्याची आवश्यकता आहे ज्या शेतकऱ्यांना वीज कनेक्शन दिले आहे. ती पंप सुरू राहिले पाहिजे, जलशिवारातून कामे झालीत. मात्र विजच नसेल तर शेतकऱ्यांना त्याचा काय उपयोग होणार साधे ऐबी स्विच व्यवस्थित नाही, जेव्हा हे पाहतो तेव्हा लाज वाटते साधी कामे होत नसल्यास तुमची जबाबदारी काय? तुम्ही राजीनामा देऊन मोकळे व्हा, नवीन तरूण येतील, असे ते म्हणाले.
हयगय खपवून घेणार नाही
अमरावती : पालकमंत्री पोटे यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडूुन विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी खा. आनंदराव अडसूळ, आ.रमेश बुंदिले, जिल्हाधिकारी किरण गित्ते, विद्युत वितरण कंपनीचे मुख्य अभियंता रंगारी, अधीक्षक अभियंता पाटील व घुगल तसेच जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ना. पोटे म्हणाले की, शेतकऱ्यांना त्यांची शेती जगवायची आहे. शासनापुढे शेतकरी महत्त्वाचा आहे. अधिकाऱ्यांनी संवेदनशील राहून कृषी वीज जोडण्या, ट्रान्सफार्मर दुरुस्त करणे, बदलणे आदी कामे तीन दिवसांत पूर्ण करावीत, अशी ताकिद दिली आहे.
मुख्य अभियंता रंगारी यांनी जिल्ह्यात ६,३०,४१८ ग्राहक असून १,४८,१३१ शहरात तर १,६९,१६६ ग्राहक ग्रामीण भागात आहेत. ४० टक्के लोड कृषीचा आहे. १,०८,७१८ कृषी ग्राहक असून ४,७५,००० घरगुती वापर असल्याची माहिती त्यांनी दिली. इन्फ्रा-२ अंतर्गत २०५ कोटी रुपये मंजुू असून १८ जानेवारी, २०१७ पर्यंत कामे पूर्ण होणार आहेत. याशिवाय इन्फ्रा-२ साठी अतिरिक्त ८०० कोटी, विशेष पॅकेज म्हणून ३९ कोटी, अतिरिक्त विशेष पॅकेजसाठी ६३ कोटी असे एकूण ८४७.२९ कोटी रुपयांच्या योजना मंजूर असल्याचे सांगितले.