ट्रान्सफॉर्मर फोडून तांबे चोरणारे गजाआड
By admin | Published: September 29, 2016 12:08 AM2016-09-29T00:08:01+5:302016-09-29T00:08:01+5:30
तांबातार चोरणे व घरफोडीच्या गुन्ह्यात सहभागी दोन आरोपींन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी गजाआड केले.
दोन लाखांचा मुद्देमाल जप्त : दोघांना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अमरावती : तांबातार चोरणे व घरफोडीच्या गुन्ह्यात सहभागी दोन आरोपींन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी गजाआड केले. सल्लू ऊर्फ भुरेखाँ नूरखाँ पठाण (३३,रा. बैतूल, मध्य प्रदेश) व त्याचा साथीदार सय्यद नियाज सय्यद सिकंदर (२५,रा.अचलपूर) अशी अटकेतील आरोपींची नाव आहेत.
अंजनगाव,सरमसपुरा, शिरजगाव, वरूड, बेनोडा, मोर्शी, नांदगाव खंडेश्वर, शिरखेड, कुऱ्हा, तळेगाव परिसरात वीज वितरण कंपनीचे ट्रान्सफार्मर फोडून तांबातार चोरण्याच्या घटना वाढल्या होत्या. त्याचप्रमाणे घरफोडीच्या घटनांमध्येहीी वाढ झाली होती. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक तयार करून आरोपीला तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी गुन्हेगाराचा पूर्व ईतिहास तपासून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.दोन्ही आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी १५ ते १७ ठिकाणी ट्रान्सफार्मर फोडल्याची व ६ ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चारचाकी वाहन, दुचाकी, ३० किलो तांबातार असा एकूण २ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. टोळीतील अन्य आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल लाड,सहायक पोलीस निरीक्षक नागेश चतरकर, पोलीस उपनिरीक्षक पंकज काकडे, अशोकसिंह चव्हाण, अरुण मेटे, मुलचंद भांबुरकर, मोहन मोरे, त्र्यंबक मनोहरे, सचीन मिश्रा, सुनील महात्मे यांनी ही कारवाई केली.